Fri, Nov 27, 2020 11:26वात-पित्त-कफ यांचे राखा संतुलन

Last Updated: Nov 19 2020 2:18AM
प्रमोद ढेरे

वात-पित्त-कफ हे आपल्या शरीरातील त्रिदोष आहेत. हे तीन दोष जितके संतुलनात राहतील तितके आपण आरोग्यदायी राहतो. मात्र, वात-पित्त-कफ या तीन दोषांच्या आपल्या शरीरातील असंतुलनामुळे आपल्याला बरेच रोग होत असतात. त्यामुळे वात-पित्त-कफ यांचे संतुलन साधणे हेच निरोगी जीवनाचे रहस्य आहे.

वयानुसार वात-पित्त-कफ यांचा प्रभाव-

* जन्मापासून ते 14 वर्षांपर्यंतचा जो काळ असतो, त्या काळात मानवी शरीरात कफाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. या काळात भूक जास्त लागत असते, झोप जास्त लागत असते. याच काळात मुलांना कफ विकार म्हणजे सर्दी-पडसे-खोकला असे आजार होतात.
* वयाच्या 14 व्या वर्षापासून ते वयाच्या 50 व्या वर्षापर्यंतचा जो काळ असतो त्या काळात पित्ताचा प्रभाव सर्वात जास्त असतो. या काळात पित्तविकार म्हणजे अपचन, गॅस, पित्त, पोटाचे विकार, पचनक्रियेसंबंधी तक्रारी असे आजार होतात.
* वयाच्या 50 व्या वर्षापासून ते मरेपर्यंतचा जो काळ असतो त्या काळात शरीरात वाताचा प्रभाव सर्वात जास्त असतो. या काळात वातविकार म्हणजे संधीवात, गुडघेदुखी, मूळव्याध, मूत्रविकार असे आजार होतात.

दिवसभरात वेळेनुसार वात-पित्त-कफ यांचा प्रभाव-

* सकाळी सहा ते दहापर्यंतचा काळ  व संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंतचा काळ हा कफप्रधान काळ असतो. या काळात कफाची तीव्रता कमी करून वात-पित्त-कफ यांचे संतुलन साधण्यासाठी फळं खावीत, फळांचा ज्यूस प्यावा.
* सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंतचा काळ व रात्री दहा ते रात्री दोन वाजेपर्यंतचा काळ हा पित्तप्रधान काळ असतो. त्यामुळे दुपारी आपल्या शरीरातील पित्ताची तीव्रता कमी करून वात-पित्त-कफ यांचे

संतुलन साधण्यासाठी दुपारच्या जेवणात दही-ताकाचा समावेश अवश्य करावा. 

* दुपारी दोन ते संध्याकाळी सहापर्यंतचा काळ व रात्री दोन ते सकाळी सहापर्यंतचा काळ हा वातप्रधान काळ असतो. त्यामुळे रात्री आपल्या शरीरातील वाताची तीव्रता कमी करण्यासाठी संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी व झोपण्यापूर्वी एक तास आधी एक ग्लास कोमट दूध अवश्य प्यावे.

ॠतुमानानुसार वात-पित्त-कफ यांचा प्रभाव-

- पावसाळ्यात वातप्रकोप जास्त त्यामुळे या काळात वातविकार होतात.
- हिवाळ्यात पित्तप्रकोप जास्त त्यामुळे या काळात पित्तविकार होतात.
- उन्हाळ्यात कफप्रकोप जास्त त्यामुळे या काळात कफविकार होतात.

शरीराच्या अंगांप्रमाणे वात-पित्त-कफ यांचा प्रभाव-

- डोक्यापासून ते छातीपर्यंत कफप्रधान भाग असतो. या संबंधित जे आजार असतात त्यांना कफप्रधान आजार म्हणतात. यामध्ये सर्दी, पडसे, खोकला, कफ, श्‍वसनाचे विकार, थायरॉईड इ. आजार येतात.
- छातीपासून ते कमरेपर्यंतचा पित्तप्रधान भाग असतो. या संबंधित जे आजार असतात त्यांना पित्तप्रधान आजार म्हणतात. यामध्ये अपचन, गॅस, पित्त, पोटाच्या तक्रारी, पचनक्रियेसंबंधित व्याधी इ. आजार येतात.
- कमरेपासून ते पायापर्यंतचा वातप्रधान भाग असतो. या संबंधित जे आजार असतात त्यांना वातप्रधान आजार म्हणतात. यामध्ये संधीवात, गुडघेदुखी, मूळव्याध, मूत्रविकार इ. आजार येतात.

वात बिघडला तर 80 पेक्षा जास्त आजार होतात, पित्त बिघडले तर 40 पेक्षा जास्त रोग होतात व कफ बिघडले तर 20 पेक्षा जास्त आजार होतात. म्हणजेच वात-पित्त-कफ यांचे संतुलन बिघडले तर एकूण 140 ते 148 आजार होतात. त्यामुळे निरोगी जीवनाचा आनंद घेण्यासाठी वात-पित्त-कफ यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळेनुसार, काळानुसार व वयानुसार आहारात व दिनचर्येत योग्य तो बदल करणे आवश्यक आहे.