Thu, Jun 24, 2021 12:00



होमपेज › Aarogya › कोरोना टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत करायच्या ३ गोष्टी

कोरोना टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत करायच्या ३ गोष्टी

Last Updated: Jul 29 2020 8:12PM




राहुल सोनके

दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात.

भारतात कोविड-19 पेशंटची संख्या वाढत असल्याच्या बातम्या आपण दररोज वाचतोय. एका दिवसात 50 हजाराच्या घरात नवे पेशंट अशा हेडलाईन्ससह या बातम्या येतात. याचा अर्थ एका दिवसात 42 हजार जणांना लागण झाली असा होत नाही. तर आधीच्या दिवसांत केलेल्या कोरोना चाचणीपैकी किती जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आले आहेत ते त्यात सांगितलं जातं. प्रत्यक्ष वायरसची लागण आधी कधीही झालेली असू शकते.

साधारणतः वायरसची लागण झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी आपल्याला लक्षणं दिसायला सुरू होतात. काही जणांना 15 दिवसांनी लक्षणं दिसतात तर काही जण असिम्प्टोमॅटिक म्हणजे काहीच लक्षण न दिसणार्‍यांपैकी असतात. कोरोना वायरसची सुरवात झाली तेव्हा त्याची चाचणी करण्यासाठी लागणार्‍या स्वॅब टेस्टच्या किटची आपल्याकडे कमतरता होती. त्यामुळे तेव्हा फक्त लक्षणं दिसणार्‍यांचीच स्वॅब टेस्ट केली जात होती. आता मात्र, लक्षणं दिसत नसली तरीही कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने शंका येत असेल तर त्या पेशंटची स्वॅब टेस्ट केली जाते.

या स्वॅब टेस्टचे रिपोर्ट यायला कमीतकमी 12 ते 24 तास किंवा कधीकधी त्यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो. याकाळात माणूस बैचेन होतो. आपली टेस्ट पॉझिटीव येणार नाही ना, आली तर काय, आपण खूप आजारी पडलो तर काय, असे एक ना अनेक प्रश्न मनात येणं अगदी साहजिकच आहे. टेस्ट केलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लागण होईलच असं नाही. मात्र, अनावधानाने आपल्यामुळे दुसर्‍या कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मन शांत ठेवून काही गोष्टी पाळायला हव्यात.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन या अमेरिकन आरोग्य संस्थेनं कोरोनाच्या रिपोर्टची वाट बघत असताना पेशंटने काय काय करायला हवं याबद्दल एक परिपत्रक काढलंय. त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात -

1) घरी रहा आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा.

आपल्याला अगदी बरं वाटत असलं, काहीही त्रास होत नसला तरीही आपल्याला कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच माझी टेस्ट निगेटिवच येईल अशा भ्रमात राहून बाहेर फिरणं, लोकांना भेटणं योग्य नाही. आपण घरीच राहून आपल्या शरीरात काही बदल तर होत नाहीत ना या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.

- शक्य असेल तर घरातल्या इतर सदस्यांपासून लांब राहणं गरजेचं आहे. त्यातही लहान मुले, गरदोर बायका, वृद्ध माणसे, एचआयवीसह जगणारी व्यक्ती अशा कोरोना वायरसचा धोका जास्त असणार्‍या व्यक्तींपासून तर शारिरीक अंतर कटाक्षाने पाळायला हवं.
- घरात असताना सतत मास्क घालून बसणं गरजेचं आहे. घरातल्या इतर व्यक्तींनाही मास्क घालावा लागेल.
- ताप, सर्दी, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, खूप थकवा जाणवणे, जुलाब, उलटी, डोकेदुखी यापैकी कोणताही त्रास आपल्याला होतोय का याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. अनेकदा नुसतं हात लावून आपलाच ताप आपल्याला कळत नाही. त्यामुळे थर्मामीटरचा वापर करून ताप तपासून घ्यावा.

2) गेल्या काही दिवसात तुम्ही कोणाकोणाला भेटलात ते आठवा

तुमचा रिपोर्ट पॉझिटिव आला तर सार्वजनिक आरोग्य अधिकारी तुमची चौकशी करायला तुम्हाला फोन करतील. त्यावेळी गेल्या काही दिवसांत तुम्ही कोणाकोणाच्या संपर्कात आलात, कुठे गेला होतात असे प्रश्न विचारतील. त्यांनी विचारल्यावर आयत्यावेळी पटकन उत्तर आठवत नाही. त्यामुळे याचा विचार रिपोर्टची वाट बघतानाच करायला हवा. त्यासाठी या प्रश्नांची मदत होऊ शकेल.

- शाळा, कॉलेजात किंवा कामावर गेला होतात का?
- कोणत्याही व्यक्तीसोबत खायला किंवा दारू प्यायला हॉटेलमधे जाणं झालं होतं का?  व्यायामशाळेत किंवा एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या घरी, कोणत्याही पार्टीला, बागेत, पोहण्याच्या तलावात गेला होतात का?
- किराणा सामान, औषधे असं सामान आणण्यासाठी वाण्याकडे किंवा मेडिकलमधे गेला होतात का? आणखी काही खरेदी करण्यासाठी मॉलमधे जाणं झालं होतं का?
-  कटिंग दुकानात किंवा डॉक्टर अशांपैकी जवळून संपर्क येणार्‍या व्यक्तीला भेटला होतात का?
- कुणासोबत ओला, उबेर किंवा चारचाकी गाडीत बसला होतात का? किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केला होतात का?
- मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर प्रार्थना स्थळांना भेटी दिल्या होत्या का?
- गेल्या 10 दिवसांत कुणाकुणासोबत काय काय केलं याची एक यादी तयार करा. तारीख, कृती आणि कृतीचं ठिकाण या तीन गोष्टी असायला हव्यात. 6 फुटांपेक्षा कमी अंतरावरून 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळासाठी भेटलेल्या लोकांची वेगळी यादी तयार ठेवा. त्यात त्यांचे नाव, फोन नंबर, तुम्ही त्यांना शेवटी कधी भेटला होतात, कुठे भेटला होतात अशी माहिती भरा.
- तुम्ही कुणासोबत राहता त्यांची वेगळी यादी तयार करून ठेवा.

3) आरोग्य विभागातून आलेल्या फोनला व्यवस्थित उत्तर द्या.

रिपोर्ट यायच्या आधीच आरोग्य विभागातल्या एखाद्या कर्मचार्‍याने तुम्हाला फोन केला तर त्याचा फोन उचला. त्यामुळे तुमच्या भागातल्या इतर लोकांना लागण होण्यापासून वाचवता येईल. या आरोग्य अधिकार्‍यांसोबत होणारं संभाषण अत्यंत गोपनीय असतं. तुमची खासगी आणि वैद्यकीय माहिती अत्यंत सुरक्षित ठेवली जाईल. तुमच्यामुळे एखाद्याला कोरोनाची लागण झाली असली तरीही तुमचं नाव त्या व्यक्तीला सांगितलं जात नाही. फक्त तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात आले आहात त्यांना दक्षतेचा इशारा आरोग्य विभागाकडून दिला जातो.