Responsive image

तुज पाहतां विठ्ठला

By santosh.kanmuse | Publish Date: Nov 10 2019 8:05PM

डॉ. यु. म. पठाण 

माझा शिणभाग गेला। 
तुज पाहतां विठ्ठला॥
पाप-ताप ज्याती। 
तुझें नाम ज्याचे चित्तीं॥
अखंडित नामस्मरण। 
बाधूं न शके तया विघ्न॥
जनी म्हणे हरिहर। 
भजतां वैकुंठीं त्या घर॥

भक्‍ती करताना भक्‍त परमेश्‍वराशी किती एकरूप होतो, याची प्रचिती संत कवयित्री जनाबाई यांच्या या अभंगात येते. भक्‍त परमेश्‍वराचं नामस्मरण करता - करता त्याची उपासना करतो. या उपासनेची परिणती किती विलक्षण असते! भक्‍ताचे सारे आयास-सायास, सारे कष्ट, सारे ताप नाहीसे होतात. त्याची पापंही नाहीशी होतात. त्याच्या मार्गात येणार्‍या सार्‍या आपत्ती व त्याच्यावर येणारी सारी संकटं नाहीशी होतात. त्याला अपूर्व अशी मनःशांती मिळते. जणू तो देवाला प्रत्यक्ष पाहू लागतो; त्याच्याशी बोलू शकतो. केवळ परमेश्‍वराचं नाव घेतल्यानं एवढा लाभ होत असेल तर ते आपण का बरं घेऊ नये? या शब्दांत जनाबाईंनी नामस्मरणाचं माहात्म्य वर्णिलं आहे.