Responsive image

पहिला चहा : शिंग फुटलेली मुलं...

By prasad.mali | Publish Date: Jun 26 2019 8:13PM

प्रा. दिनेश डांगे

भविष्यात जन्माला आल्या-आल्या चष्मा घातलेली, दात नसलेली किंवा वेड्यावाकड्या दातांची, तसेच डोळ्यावर शिंगे उगविलेली मुले पाहावयास मिळाली नाहीत तरच नवल! या सगळ्या गोष्टींना आपण जबाबदार असणार आहोत. कारण, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार! पेराल तसे उगवणार आहे. पोरांच्यात जर मोबाईल गेम पेराल तर मुलांच्या डोक्यावर शिंगे उगवणार! ऑस्ट्रेलियात झालेल्या संशोधनानुसार मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांच्या डोक्यावर शिंग उगवण्याची मोठी शक्यता वर्तवली आहे. वर्गात मुले आगाऊपणा करू लागली, की पूर्वी शिक्षक त्यांना शेपूट उगवले का? किंवा कान फार लांब झालेत का? किंवा डोक्यावर शिंग उगवले का? म्हणायचे! बहुतेक त्या शिक्षकांना भविष्यात लपलेली ‘ही’ शिंगे अगोदरच दिसली असावीत. हल्‍ली तुमचा मुलगा काय करतो, म्हटलं तर पालक उत्तर देतात, आमचा मुलगा पबजी खेळतो! वय काय त्याचे? तर म्हणतात दहा वर्षे! हे काहीच नाही. आमच्या मुलाबरोबर पाच वर्षे वयाच्या मुलापासून तेरा-चौदा वयापर्यंतची मुले मोबाईलवर तासन्तास गेम खेळतात, असेही सांगतात. मग याचा तुम्हाला काय फायदा होतो, विचारल्यावर त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागत नाही. घरापर्यंत कुठले भांडण येत नाही. तासन्तास ती मोबाईलवरच असतात. म्युनिसिपाल्टीच्या बाकड्यावर बसतात. जेवण नसले तरी त्यांना चालते असे मोठ्या अभिमानाने पालक सांगतात. अहो पण, मोबाईलवर सारे ‘विश्‍व’दर्शन उपलब्ध असते. त्यातून ती बिघडली तर? त्यावर पालक म्हणतात, बिघडली तर बिघडली! अहो, जमानाच बदललाय तर तुम्ही आम्ही काय करणार? अहो, आम्ही पालक मंडळीही रात्रंदिवस मोबाईललाच चिकटलेलो असतो. आम्ही तर म्हणतो की आमच्या मुलाच्या कपाळावर एखादे शिंग उगवले, तर त्याचा फोटो डिजिटल बोर्डवर लावून भागातला प्रथम शिंगधारी म्हणून त्याचा गौरव करू! गर्व से कहो कि हम शिंगधारी हैं, ही घोषणा आम्ही त्यावर छापू! या पबजी खेळाला ग्राऊंड लागत नाही, की कुठले खेळ साहित्य लागत नाही. त्यामुळे याला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्य द्यावी आणि मुलगा वाया जाणार ही भीती बाळगू नका. नाही तरी शिकून सवरून नोकरी न मिळाल्यामुळे तो असा तसा वाया जाणारच आहे. त्यामुळे घरटी मोबाईल आणि घरटी पबजी हीच आमची मागणी आहे. मराठी वाचवा म्हणायची गरजच लागणार नाही ना! कारण आधी पोरं वाचली पाहिजेत ना?