Responsive image

कालाय तस्मै नम:

By aslam.shanedivan | Publish Date: Sep 15 2019 8:10PM

अग्रलेख

राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात आजकाल इतका उतावळेपणा आलेला आहे, की राजकारण हा बुद्धिबळासारखा संयमाचा खेळ असल्याचे सगळेच विसरून गेले आहेत. त्यामुळे त्यातल्या त्यात ज्यांच्यापाशी संयम व धीर धरण्याची क्षमता अधिक आहे, त्यांना सहज यश मिळते आहे आणि अधिकच उतावळे असलेल्यांना नित्यनेमाने तोंडघशी पडताना आपण पाहत आहोत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे, आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होत. तीन महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत नायडू यांचा दारुण पराभव झालेला आहे. किंबहुना, त्यांनी तो लज्जास्पद पराभव ओढवूनच आणलेला होता. कारण, आधी वर्षभर त्यांनी दिल्लीतले मोदी सरकार पाडण्यासाठी एकाहून एक विचित्र कसरती केल्या होत्या. त्यामागे कुठले तर्कशास्त्र नव्हते किंवा कुठली ठाम भूमिका नव्हती. 2014 नंतर आंध्रात दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवतानाही चंद्राबाबूंना स्वबळावर निवडणूक लढता आलेली नव्हती. त्यांनी भाजपशी हातमिळवणी करूनच मोठे यश मिळवले होते आणि तेव्हाही त्यांच्या मतांची संख्या विरोधात बसलेल्या जगन रेड्डी यांच्या पक्षाच्या तुलनेत सारखीच होती. म्हणजे, भाजपच्या कुबड्या घेतल्यानेच त्यांना लोकसभा व विधानसभेत चांगले यश मिळालेले होते; पण त्याचीच दुसरी बाजू अशी होती, की स्वबळावर चंद्राबाबू आंध्रातही बाजी मारू शकत नव्हते. म्हणून त्यांनी मोदींशी खटकले तर सरळ विरोधकांशी हातमिळवणी केली व उतावळेपणा सुरू केला. ज्या सरकारचे अंग म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले, त्याच सरकार विरोधात थेट अविश्वास प्रस्ताव आणण्यापर्यंत मजल मारणे हा उतावळेपणाच नव्हता, तर अतिरेक होता. तो प्रस्ताव तोंडघशी पडलाच; पण तिथून चंद्राबाबूंची घसरण सुरू झाली. कारण, पुढल्या काळात व्यक्तिगत दुष्मनी करावी, तसे ते प्रत्येक बाबतीत मोदी वा भाजपला अपशकून करण्यासाठीच राबत राहिले; पण यातून त्यांचे कोणते राजकीय हेतू साध्य व्हायचे होते, त्याचा खुलासा कधीच होऊ शकला नाही; मात्र अशा प्रत्येक खेळीतून चंद्राबाबूंचे राजकीय नुकसान होत राहिले. त्यापासून धडा घेण्यापेक्षा त्यांनी आणखीनच प्रक्षुब्ध होऊन चुकीच्या खेळी चालू ठेवल्या आणि लोकसभेत त्यांचा पुरता बोजवारा उडून गेला. याचे पहिले कारण कुवत लक्षात न घेताच त्यांनी देशाच्या राजकारणात उलथापालथ घडवण्याचा आव आणला होता. देशव्यापी पुरोगामी आघाडी उभारण्यापासून अनेक खेळी करताना आपल्याच राज्यात आपले पाय मजबूत असायला हवेत, याचेही भान त्यांना ठेवता आले नाही. साहजिकच, आपले राज्य व मतदार यांच्याकडे पाठ फिरवलेल्या या नेत्याला तेलगू मतदाराने चांगलाच धडा शिकवला. आज चंद्राबाबूंची अवस्था परागंदा राजकारण्यासारखी झाली आहे आणि त्यांची सत्ता हिसकावून घेणारा नवा राज्यकर्ता जगन रेड्डी चहूकडून कोंडी करतो आहे; पण त्याला समर्थपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमताही चंद्राबाबू हरवून बसले आहेत. सत्याग्रह करायला निघालेल्या चंद्राबाबूंना त्यांच्या घरातच राज्य सरकारने स्थानबद्ध केलेले आहे. कुठलेही नवे सरकार मोठे बहुमत मिळवून सत्तेत येते, तेव्हा आरंभीच्या काही महिन्यांत किंवा कालखंडात त्याच्या विरोधात आंदोलन करण्यात अर्थ नसतो. कारण, कालपर्यंत सत्ताधीश असलेल्या आजच्या विरोधकांवरील रागामुळेच जनतेने सत्तांतर घडवलेले असते. त्याच रागातून नवा नेता सत्ताधीश झालेला असतो आणि त्याच्या प्रत्येक कृतीला जनतेचे समर्थन मिळत असते. ते प्रत्यक्षात समर्थन नसते, तर पराभूत सत्ताधार्‍यांवरचा रागच त्यातून व्यक्त होत असतो. म्हणूनच, पराभवानंतर काही काळ विरोधात आलेल्या नेता वा पक्षाने शांत राहून नव्या सत्ताधार्‍याला चुका करण्याची मोकळीक द्यायची असते. जितकी निरंकुश सत्ता नवा सत्ताधीश उपभोगू लागतो, तितका बेताल होऊन चूक करू लागतो. मग त्याचे चटके बसलेल्या जनतेला राग येऊ लागतो आणि त्या रागावर स्वार होण्याची संधी पराभूत नेत्याला मिळत असते. त्याने फक्त अशी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची प्रतीक्षा केली पाहिजे. सत्ताधार्‍याला चुका करण्याची संधी दिली पाहिजे आणि चुका करण्यासही भाग पाडायचे असते. त्यालाच राजकीय डावपेच म्हणतात. चंद्राबाबूंना तितका संयम दाखवता आलेला नाही. म्हणूनच, त्यांनी तीन महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या जगन रेड्डी यांच्या सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना सरळ अटक करून त्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत; पण तरीही कुठे संतप्त प्रतिक्रिया उमटलेली नाही. कारण, चंद्राबाबू दोन वर्षांपूर्वी जितक्या बिनबुडाच्या विरोधात कंबर कसून उभे राहिले होते, तितकेच त्यांचे आजचे आरोप निरर्थक आहेत. त्यात तथ्य जरूर आहे. अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्याची तक्रार तितकीच प्रभावी असती, तर तिथेच मुस्लिमांचा पक्ष चालवणारे ओवैसी निमूट बसले नसते; पण जगनला सत्तेतून खेचण्याच्या इच्छेने प्रभावित झालेल्या चंद्राबाबूंना कोणी समजवायचे? मागल्या वर्षभरात ज्या विविध प्रादेशिक वा पुरोगामी पक्षनेत्यांना घेऊन चंद्राबाबू नाचत होते, त्यापैकी कोणीही आता त्यांच्या मदतीला आलेला नाही. आणि कशाला येईल? राजकीय सूडबुद्धीचा जो पायंडा चंद्राबाबूंनी घालून दिला आहे, त्यावरूनच जगन रेड्डी वाटचाल करत आहेत. मोदी सरकारशी फाटले म्हणून नायडूंनी आंध्रमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयलाही प्रतिबंध लावला होता. त्याला राजकारणातलाच हेतू होता ना? सत्ता आपल्या हाती असली की मग कुठल्याही कृतीला राजकीय हेतू चिकटवण्याचा हा पायंडा त्यांनीच पाडलेला आहे आणि जगन आता त्याचेच डोस चंद्राबाबूंना पाजत आहेत. सत्ता असताना मस्ती करू नये आणि तीच सत्ता गमावल्यावर आपल्यास पोषक परिस्थिती येईपर्यंत प्रतीक्षा करावी, इतके साधे तर्कशास्त्र चंद्राबाबू विसरून गेलेले आहेत. सूडबुद्धीने विवेकबुद्धीला पांगळे केल्यावर यापेक्षा वेगळे काहीही घडत नाही. ते ओळखून पाच वर्षे जगन प्रतीक्षा करीत राहिले, त्याचे फळ त्यांना मिळाले. चंद्राबाबूंना अजून ‘कालाय तस्मै नम:’ म्हणजे काय तेच उमजलेले नाही.