Responsive image

गुन्हेगारीचा ‘विकास’

By aslam.shanedivan | Publish Date: Jul 12 2020 8:11PM

अग्रलेख

सहा दिवसांपूर्वी कानपूर येथे आठ पोलिसांनाच चकमकीत ठार मारून फरारी झालेल्या विकास दुबे नामक गुंडाला गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल मंदिराच्या आवारात पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यापूर्वी सहा राज्यांत पोलिस त्याचा पाठलाग करीत होते आणि दरम्यान त्याच्या विविध साथीदारांचा खात्मा विविध चकमकीत झालेला आहे. बहुधा, त्याच मोहिमेत आपलाही चकमकीत बळी पडू नये म्हणून विकासने अप्रत्यक्षरीत्या शरणागती पत्करलेली असावी काय? निदान अनेकांना तशी शंका आहे. कारण, त्याला अटक करून पोलिस गाडीत बसवित असतानाही त्याचा मस्तवालपणा संपलेला नव्हता. तिथे गर्दी केलेल्या माध्यमांच्या कॅमेर्‍यांसमोर ओरडून ही व्यक्‍ती ‘आपणच कानपूरचा विकास दुबे’ असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत होता. त्यातून त्याची व्यक्‍तिगत मस्ती वा माज व्यक्‍त झालेला नाही, तर देशातील एकूणच पोलिस व कायदा व्यवस्थेची अगतिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांचे दक्षता पथक कारवाई करणार असल्याची खबर त्याला आधी लागली होती. त्याने तिथून पळ काढला असता, तरी हरकत नव्हती; पण त्याने पळण्यापेक्षा तिथे पोलिसांशी दोन हात करण्याचा पवित्रा घेतला आणि पुढले हत्याकांड घडलेले होते. चौबेपूरच्या आपल्या किल्लावजा चिरेबंदी घरात पोलिस पथकासाठी जणू सापळाच त्याने लावला होता. म्हणूनच पथकाच्या एका अधिकार्‍यासह आठजणांचा दुबेच्या गोळीबारात बळी गेला. त्यातला पहिला आरोपी स्थानिक पोलिस ठाण्याचाच प्रमुख होता आणि त्याच्यासह अनेक स्थानिक पोलिसांनाही आता निलंबित करून अटक झालेली आहे; पण ते हत्याकांड केल्यावर फरारी झालेला विकास दुबे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात सहीसलामत निसटू शकला. दिल्लीनजीक फरिदाबाद येथे तो लपल्याची माहिती मिळताच पोलिस तिथे पोहोचले; पण तत्पूर्वीच विकास तिथूनही सटकला होता. म्हणजेच एका कानपूर वा उत्तर प्रदेश पुरते त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचे जाळे पसरलेले नाही. त्याच्या या साम्राज्यात अनेक शासकीय अधिकारी व पोलिसांचाही समावेश असणार. किंबहुना, पोलिस यंत्रणेपेक्षाही त्याच्या गुन्हेगारीची यंत्रणा अधिक सज्ज व सतर्क असते, असाच निष्कर्ष काढावा लागतो. हा अर्थातच टीकेचा विषय आहे; पण ही शासकीय यंत्रणा इतकी सहजासहजी पोखरली गेली किंवा कालपरवा योगी सरकार सत्तेत आल्यावर नासली असे म्हणायचे काय? इतक्या अल्पावधीत असे साम्राज्य उभे राहत नाही आणि राजकीय आश्रयाशिवाय त्याची उभारणीही होऊ शकत नाही. म्हणूनच त्याची पार्श्‍वभूमी व इतिहास महत्त्वाचा ठरतो.

विकास दुबे उत्तर प्रदेशात सर्वच पक्षांचा आश्रयदाता होता किंवा बहुतांश राजकीय पक्ष त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आश्रयदाते होते अन्यथा गंभीर स्वरूपाचे साठ गुन्हे त्याच्यावर नोंदलेले असतानाही त्याला असे साम्राज्य उभारता आले नसते किंवा चालवता आले नसते. आज योगी सरकारला टीकेचे लक्ष्य बनवणारे विरोधी पक्ष सत्तेत असताना त्याचा बंदोबस्त करू शकलेले नाहीत. किंबहुना, दुबे त्यांच्याही पक्षाच्या आश्रयाला गेलेला होता. त्यामुळे कुणाही राजकीय नेत्याला वा पक्षाला हात झटकता येणार नाहीत. भाजप, काँग्रेस, समाजवादी, बसप अशा प्रत्येक पक्षांत दुबेचा वावर होता आणि सर्वच पक्षांनी त्याची कधी ना कधी पाठराखण केलेली आहे. राजकीय पक्षांना सत्ता मिळाल्यावर त्यांच्या कृपेने गुन्हेगारी बोकाळत असते. कारण, त्यांच्या हाती कायदा व्यवस्था व पोलिस यंत्रणेची सूत्रे येत असतात. साहजिकच, अशा सत्तेतील पक्षाच्या आश्रयाला गेलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे पोलिसांनाही अशक्य होऊन जाते. त्यापेक्षा पोलिसच कायद्याची शस्त्रे गुन्हेगारांच्या चरणी अर्पण करीत असतात. आपणही त्या गंगेत हात धुवून घेण्याची प्रवृत्ती बळावत जाते आणि सगळी प्रशासकीय यंत्रणाच पोखरली जात असते. विकास दुबेवरून आज माध्यमात रान उठले आहे; पण त्याला साठ गुन्हे असतानाही पोलिसांप्रमाणेच न्यायालयीन यंत्रणा का रोखू शकली नाही? याचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? जामिनावर सुटलेले गुन्हेगार समाजात अधिक दहशत माजवू शकतात आणि कायदा त्यांच्या मुसक्या बांधू शकत नसल्याची भीती, हे खरे धारदार शस्त्र होऊन जाते. कधीतरी त्याकडे गंभीरपणे बघितले जाणार आहे काय? अलीकडला इतिहास तपासला तर मानवाधिकार जितके गुन्हेगारीचे आश्रयदाते झालेले आहेत, तितके अन्य कुठले गुन्हेगारांसाठीचे कवचकुंडल नसेल. त्यावरून असे काहूर माजवले जाते की, गुन्हेगारांना शिक्षा वा कायद्याचा धाकच उरलेला नाही. विविध दहशतवादी अथवा फाशीची शिक्षा झालेले व चकमकीत मारलेे गेलेले गुन्हेगार, यांच्यासाठी मानवाधिकार कार्यकर्ते व वकिलांनी चालवलेल्या मोहिमांनी गुन्हेगारीला किती निर्भय करून टाकलेले आहे, त्याचा हा साक्षात्कार आहे. त्यातून गुन्हेगार संपवण्यासाठी चकमकीत त्यांचा खात्मा करणे किंवा त्यांच्याशीच साटेलोटे करून आपलेही उखळ पांढरे करून घेणे, इतकाच पोलिसांनाही पर्याय उरला आहे. मग बोट कोणी कोणाकडे दाखवायचे? विकास दुबेला पकडण्याला महत्त्व नाही, इतके त्याला इतका मोठा अक्राळविक्राळ राक्षस करण्यापर्यंत मोठा कुठल्या परिस्थिती व क्रियेने बनवले, त्याचा अभ्यास आवश्यक आहे. कारण, विकास दुबेला मारून वा पकडून गुन्हेगारी संपणार नाही. जोपर्यंत दाऊद वा दुबे यांना पोषक परिस्थिती आहे, तोपर्यंत त्यांचे नवनवे अवतार 
उदयास येणारच.