Tue, Mar 09, 2021 16:51होमपेज › संपादकीय › प्रासंगिक : कोजागरीचा गर्भितार्थ ›

प्रासंगिक : कोजागरीचा गर्भितार्थ

By ramesh.patil | Publish Date: Oct 05 2017 1:35AMसु. ल. हिंगणे

भारतीय संस्कृतीत प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आश्‍विन महिन्यामध्ये येणार्‍या पौर्णिमेलाही धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि को-जागरती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते. म्हणूनच या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.

आज कोजागरी पौर्णिमा. धर्मशास्त्रानुसार आणि पुराणानुसार भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा, राखीपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, वटपौर्णिमा ही याची ठळक उदाहरणे सांगता येतील. याचप्रमाणे आश्‍विन महिन्यात येणार्‍या पौर्णिमेचेही एक वेगळे महत्त्व आहे. या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हटले जाते. त्याचबरोबर ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येत असल्यामुळे तिला ‘शरद पौर्णिमा’ असंही संबोधलं जातं. असं म्हणतात की, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो आणि तो सोळा कलांनी संपन्‍न असतो. त्यामुळे चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर थेट पडतो. म्हणून या दिवशी अन्‍नपदार्थ आणि दूध चंद्रप्रकाशात उघडे ठेवले जातात. चंद्राच्या  शीतल प्रकाशामुळे दुधाची गोडी आणि गुणधर्म यात वाढ होते. या दिवशी चंद्र अतिशय तेजस्वी दिसतो.

शरद ऋतूमध्येही निसर्गात होणार्‍या बदलांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो. या दिवसांत उष्णतेचे प्रमाणही वाढलेले असते. या काळात आजार जडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी चंद्राच्या शीतल प्रकाशात बराच काळ ठेवलेले शीतल दूध प्रत्येकाने घेतले तर त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. दूध हे निसर्गतः थंड प्रकृतीचे आहे. चंद्रप्रकाशाची शीतलता आणि दुधाचा थंडावा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. कोजागरीला घेतलेले आयुर्वेदिक औषध लवकर लागू पडते म्हणून या दिवशी दम्यावर आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. 

कोजागीरी पौर्णिमेच्या रात्री श्री लक्ष्मी आणि ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा केली जाते. पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध सगळ्यांना दिले जाते. या दिवशी उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात, की या दिवशी साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि को-जागरती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते. म्हणूनच या दिवसाला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. लक्ष्मीच्या स्वागतासाठी कोजागरीला रात्री रस्ते, घरे, मंदिरे, घाट, उद्याने इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावले जातात. या दिवशी जो मनुष्य लक्ष्मीदेवीची मनोभावे पूजा करतो आणि रात्रभर जागरण करतो त्याला श्रीलक्ष्मी प्रसन्‍न होते अशी श्रद्धा आहे. 

घरात, गच्चीवर, मंदिरात, उद्यानात, नदीकाठी ज्याला जसे जमेल त्या ठिकाणी कोजागरी साजरी केली जाते. आप्तेष्ट, मित्रमंडळी, शेजारी असे सगळे मिळून कोजागरी साजरी करतात.  गप्पा, गोष्टी, गाणी आणि काहीजण नृत्य करूनही ही रात्र जागवतात.  कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास आणि गरबा खेळून ‘शरद पूनम’ नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात आणि लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्‍विनी साजरी करतात. कोजागरी दिवशी नवान्‍न पौर्णिमा साजरी केली जाते. 

 शास्त्रानुसार कोजागरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्‍त असते. या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो. ज्याप्रकारे  सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो, त्याचप्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. यामुळे या दिवशी काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे. या उपायाने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते. तसेच ही पौर्णिमा डोळ्यांसाठीही लाभदायक असते. तुमची डोळ्यांची शक्‍ती कमी झाली असेल तर कोजागरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पाहा. त्यामुळे डोळ्यांची शक्‍ती वाढण्यास मदत होते.  

चंद्र हा मानवी मनाचा कारक समजला जातो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी मानवी मन सकारात्मक ऊर्जेचा अनुभव करते. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो त्यामुळेही रात्रभर  चंद्राकडून  पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाहत असतो. जे लोक याचा अनुभव घेतात त्याचा त्यांना निश्‍चितच लाभ होतो. हेच या कोजागरी पौर्णिमेचे वैशिष्ट्य आहे.