Thu, Jun 24, 2021 10:45
होमपेज › संपादकीय › विषाणूच्या नव्या प्रतिरूपांचा धोका  ›

विषाणूच्या नव्या प्रतिरूपांचा धोका 

By arun.patil | Publish Date: Apr 01 2021 2:51AM
- प्रा. विजया पंडित

देशात कोरोना विषाणूची तब्बल 771 प्रतिरूपे (व्हेरिएन्ट) सापडली असून, त्यामुळेच देशभरात रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे. विषाणू आता दुहेरी हल्ला चढवीत असून, एकीकडे वेगाने संसर्ग पसरवितानाच दुसरीकडे विषाणू रुग्णांच्या रोगप्रतिकार शक्तीवर आघात करीत आहे. आरोग्य मंत्रालयाने दहा राष्ट्रीय प्रयोगशाळांचा एक समूह तयार केला होता. या समूहाने कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या प्रतिरूपांचे जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे जनुकीय क्रमवारी केली. भारतात कोरोना विषाणूच्या 10 हजार 787 नमुन्यांची चाचणी केल्यानंतर 771 वेगवेगळी प्रतिरूपे आढळून आली. यातील 736 नमुने ब्रिटनमधून आलेल्या कोरोना विषाणूच्या प्रतिरूपांचे आहेत, तर 34 नमुने दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या विषाणूच्या प्रतिरूपांचे आहेत.

हे सर्व नमुने अशा व्यक्तींचे होते की, जे परदेश प्रवास करून आले होते किंवा परदेश प्रवास करून आलेल्यांच्या संपर्कात आले होते. नवीन म्युटेशनचे विषाणू संसर्गाचा फैलाव प्रचंड वेगाने करीत आहेत; शिवाय चांगली प्रतिकारशक्ती असली तरी फारसा फायदा होत नाही. म्हणजेच या प्रकारच्या विषाणूचा धोका दुहेरी आहे. तपासणीसाठी पाठविलेल्या 771 प्रतिरूपांपैकी 20 टक्के अशाच स्वरूपाचे आढळून आले. त्यांना ‘व्हेरिएन्ट ऑफ कन्सर्न’ म्हणजेच ‘धोकादायक प्रतिरूपे’ मानले आहे. केरळमधील सर्व 14 जिल्ह्यांमध्ये 2032 नमुन्यांचे सिक्वेन्सिंग केले. यापैकी 11 जिल्ह्यांमधील 123 नमुन्यांसमोर रोगप्रतिकारशक्तीही हतबल ठरते. आंध्र प्रदेशातील एकूण नमुन्यांपैकी 33 टक्के नमुने अशा प्रकारच्या व्हेरिएन्टचे असून, तेलंगणातील 104 नमुन्यांपैकी 53 नमुने अशा व्हेरिएन्टचे आहेत. 

भारतात सध्या वाढत चाललेला कोरोना रुग्णांचा आकडा हा नवीन प्रतिरूपांचाच परिपाक असल्याचे सांगितले जात आहे. इंग्लंडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला. याच व्हेरिएन्टचे विषाणू भारतात आढळून आल्याचे दिसत आहे. केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर उत्तर भारतातसुद्धा पंजाब सरकारने तपासणीसाठी पाठविलेल्या 401 पैकी 81 नमुन्यांमध्ये हे व्हेरिएन्ट दिसून आले. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड-19 साठी कारणीभूत ठरलेल्या पूर्वीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत नवीन व्हेरिएन्ट 30 ते 70 टक्के अधिक वेगाने फैलावत आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या विषाणूपेक्षा तो अधिक घातकही आहे. कोव्हिड-19 च्या विषाणूचे सुमारे 20 म्युटेशन असे आहेत की, जे मानवी पेशींमध्ये बंदिस्त होऊन पेशींना संसर्गित करतात. भारतातील धोका वाढत असल्याचे हे चिन्ह तर आहेच; शिवाय यानिमित्ताने म्युटेशन, व्हेरिएन्ट अशा विविध शब्दांची माहिती सर्वसामान्यांनी करून घेतली पाहिजे. कारण यापुढे आपल्याकडे या विषाणूविषयी जेवढे अधिक ज्ञान असेल, तेवढाच त्याची लागण होण्याचा धोका कमी होईल. 

कोरोनाच्या विषाणूत साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल साडेपाच हजारांहून अधिक वेळा परिवर्तन (म्युटेशन) झाले आहे. आयआयटी इंदूरने संशोधनात हा दावा केला आहे. हे परिवर्तन कसे होते, हे समजून घेतले पाहिजे. कोरोना विषाणूच्या आत असलेले प्रथिन बदलते, तेव्हा त्याचे स्वरूप बदलते. या प्रथिनाच्या आवरणामुळेच विषाणूचा आरएनए मानवी पेशीबरोबर स्वतःला जोडून घेतो आणि या आवरणाच्या माध्यमातूनच तो पेशीच्या आत शिरतो. या प्रथिनाच्या आवरणामुळेच विषाणूचा प्रकोप आणि प्रभाव वाढतो. प्रथिनांची ही वेगवेगळी आवरणे आतापर्यंत ई, एम आणि एस या नावांनी ओळखली गेली आहेत. आयआयटीने जगभरातील विषाणूंच्या 22 हजार प्रथिनांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. जुलै 2020 पर्यंत जगभरात आढळलेल्या विषाणूंना वेगळे काढून त्यांच्या प्रथिन आवरणांचा अभ्यास केला गेला. या पृथःकरण प्रक्रियेत ब्रिटन, अमेरिका, भारत आणि अन्य देशांतील नमुन्यांच्या अभ्यासातून कोरोना विषाणूची जवळजवळ  5,647 प्रतिरूपे तयार झाल्याचे समोर आले.

विषाणूची जी घातक प्रतिरूपे भारतात आढळली आहेत, त्यांना ‘डबल म्युटेट व्हेरिएन्ट’ असेही नाव दिले जात आहे. काही राज्यांमध्ये वेगाने वाढत असलेल्या संसर्गाशी संबंध जोडावा एवढ्या मोठ्या संख्येने ही वेगळी प्रतिरूपे सापडलेली नाहीत, असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. वस्तुतः रुग्णसंख्येचा वाढत असलेला वेग हे या नव्या प्रतिरूपांचाच परिणाम आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. नव्या व्हेरिएन्टचा शोध लावण्यासाठी देशातील दहा प्रयोगशाळांचा जो समूह तयार केला होता, त्याला ‘इन्साकॉग’ असे नाव दिले होते. 25 डिसेंबर 2020 रोजी स्थापना झाल्यापासून हा समूह विषाणूच्या फैलावाचे विश्लेषण जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून करीत आहे. वेगवेगळ्या राज्यांनी पाठविलेल्या 10,787 नमुन्यांचे विश्लेषण करून या समूहाने हा निष्कर्ष काढला आहे. 771 नवीन स्ट्रेनपैकी 736 स्ट्रेन ब्रिटनमधील असल्याचे स्पष्ट झाल्याने ब्रिटनमध्ये ज्याप्रमाणे नवा स्ट्रेन त्रासदायक ठरला होता, तशी खळबळ तो भारतातही उडवून देऊ शकतो, या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

ब्रिटनमधील नव्या विषाणूशी मिळताजुळता स्ट्रेन भारतात सर्वप्रथम 29 डिसेंबर 2020 रोजीच मिळाला होता. आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी 16 मार्च रोजी राज्यसभेत असे सांगितले की, भारतात बाहेरून आलेल्या व्हेरिएन्टमुळे अन्य व्यक्ती बाधित झाल्याचे उदाहरण  नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या तीन ठिकाणीच नवीन व्हेरिएन्ट आहे. त्यातील ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत तयार झालेला व्हेरिएन्ट पहिल्यापेक्षा बराच वेगळा आहे. म्हणजे यापूर्वी कोरोना झालेल्यांना तो पुन्हा बाधित करू शकतो. ही लेखी माहिती आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली होती. आता 771 नवे व्हेरिएन्ट सापडल्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहे. सध्या पॉझिटिव्ह असलेल्या या व्यक्तींच्या संपर्कात किती जण आले होते आणि त्यापैकी किती जणांना संसर्ग झाला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असून, वेगाने वाढत चाललेली रुग्णसंख्या हा त्याचाच परिणाम असेल तर आपण काळजी घेण्यात कमी पडतो आहोत असे म्हणावे लागेल.