Responsive image

गँगवॉरचा कर्दनकाळ

By santosh.kanmuse | Publish Date: Nov 10 2019 8:05PM

अग्रलेख

1980 च्या दशकात मुंबईत गँगवॉरचे पेव फुटलेले होते आणि मुंबईत कुठेही कोणीही सुरक्षित राहिला नाही, अशी एक भीती मूळ धरलेली होती. कारण, जेजे इस्पितळाच्या वॉर्डापासून महालक्ष्मी स्थानकाच्या वर्दळीच्या पुलावरसुद्धा राजरोस गुन्हेगार व गुंड एकमेकांचे मुडदे पाडत होते. मुंबईनजीकच्या एका शहराचा नगराध्यक्षच मारेकरी गुंड घेऊन चेकनाक्यावरून त्यांना सुखरूप कुठेही पोहोचता करायचा किंवा संरक्षणमंत्र्याच्या लष्करी विमानातूनदेखील मारेकर्‍यांना मुंबईबाहेरून आणले जात होते. त्यामुळे मुंबई पोलिस खात्याची अब्रू वेशीला टांगलेली होती. कुठलाही व्यापारी, चित्रपट व्यावसायिकाला वा बिल्डर-डेव्हलपरला त्याच्या जीवाच्या शाश्‍वतीची हमी गुन्हेगार देऊ शकत होता; पण कायद्याचे अंमलदार विश्‍वासार्ह उरलेले नव्हते. अनेक गुंड टोळ्या उदयास आलेल्या होत्या व त्यांचेच राज्य मुंबईवर चालत होते, अशी सार्वत्रिक समजूत झालेली होती. त्या काळात मुंबईची गुन्हेशाखा हातात घेणार्‍या अधिकार्‍याचे नाव होते अरविंद इमानदार. त्यांनी मुंबईचे सहआयुक्‍त म्हणून मुंबईच्या गुन्हेगारीला पायबंद घालण्याची जबाबदारी पत्करली आणि त्यांच्याच कारकिर्दीत या गँगवॉरचा कणा मोडला गेला. आज ज्याला जगात दहशतवादी म्हणून ओळखले जाते, तो पाकिस्तानात लपून बसलेला दाऊद इब्राहीम, देश सोडून फरारी झाला तोही त्यांच्याच काळात. त्यांच्याच कारकिर्दीत या टोळ्यांचा बीमोड होऊ शकला; मात्र इतका पराक्रम करून दाखवणार्‍या त्या कर्तबगार अधिकार्‍याला कधी महत्त्वाची नेमणूक मिळाली नाही आणि मुंबईचा आयुक्‍त होण्याचा मानही मिळू शकला नाही. राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून इनामदार निवृत्त झाले, तरी त्यांच्या गुणांचे कधीच कौतुक झाले नाही. शुक्रवारी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची बातमी आल्यावर तीन-चार दशकांपूर्वीचा तो  कालखंड आठवला. त्यांच्या नेमणुकीपूर्वी मुंबईत संघटित गुन्हेगारीची जी दहशत होती, त्याची कल्पनाही आजच्या मुंबईकरांना येणार नाही. दाऊद वा गवळी, छोटा राजन वा शकील, अशा कुख्यात गुन्हेगारांच्या अड्ड्यात जायलाही पोलिस दचकत होते. तिथून काम सुरू करून मोकाट सुटलेले गँगवॉर आटोक्यात आणणे सोपे काम नव्हते; पण मोजक्या विश्‍वासू व धाडसी अधिकार्‍यांना व सहकार्‍यांना हाताशी धरून इनामदार यांनी प्रथमच कायद्याची दहशत गुन्हेगारी जगतामध्ये निर्माण केली. आज जो एन्काऊंटर शब्द प्रचलित झाला आहे किंवा सहजगत्या वापरला जात असतो, त्याचा जन्म त्यांच्याच कारकिर्दीत झाला. आपल्या कारकिर्दीत त्यांना आपले वरिष्ठ वा राजकीय धनी यांना दुखवावे लागले होते. कारण, नुसता कर्तव्यदक्ष अधिकारी अशीच त्यांची ओळख नव्हती, तर कायद्याचे राज्य व सुव्यवस्था हा त्यांचा बाणा होता. त्यासाठी किंमत मोजण्याची हिंमतही त्यांनी दाखवली होती. म्हणूनच, त्यांना बढत्या पदोन्‍नती मिळताना कायम अडथळे येत राहिले; पण त्यांनी व्यक्‍तिगत लाभाची कधी पर्वा केली नाही किंवा त्यासाठी आपल्या सत्त्वाशी तडजोडी केल्या नाहीत. दगडी चाळ वा पाकमोडिया स्ट्रीट अशा शब्दांचा धाक त्यांच्यामुळे संपून गेला. कारण, त्यांनी संघटित गुन्हेगारीचा नुसता बंदोबस्तच केला नाही, तर गुन्हेगारीकडे वळणार्‍या तरुणांना त्यातले धोके दिसतील, याचीही काळजी घेतली होती. त्यावर फारसे लिहिले गेले नाही किंवा त्यांनी ज्या अधिकार्‍यांना हिंमत देऊन कामाला जुंपले, त्यांचा खूप गवगवा झाला. किंबहुना, इनामदार यांच्या पुढाकारामुळे मुंबई पोलिस खात्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला व हळूहळू मुंबईची घडी बसत गेली. त्यासाठी त्यांचे कौतुक झाले त्याच्याही ते आहारी गेले नाहीत. राजकारण खेळताना अशा अधिकार्‍यांना पंखाखाली घेणार्‍यांपासून चार हात दूर राहण्यात त्यांनी धन्यता मानली. म्हणूनच, त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा डंका कधी पिटला गेला नाही. त्यांना निवृत्तीनंतर कुठे मानाची नेमणूक मिळाली नाही. मुद्दा त्यांच्या सन्मानाचा किंवा नेमणुकीचा नव्हता. कुशलतेने आपले काम करणारा व जटिल गुन्हेगारीला वेसण घालून दाखवणारा असा अधिकारी, हा समाजासाठी देणगी असते. त्याच्या अनुभवाचा व क्षमतेचा निवृत्तीनंतरही उपयोग होऊ शकला असता; पण तो झाला नाही. कारण, कर्तव्य आणि अगतिकता यात तडजोड करण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती. प्रदीप शर्मा, दया नायक, विजय साळसकर ही नावे आपण अनेकदा ऐकत असतो; पण त्यांच्या हिंमतीचा जनक असलेल्या अरविंद इनामदारांचे नाव सहसा कानावर येत नाही. म्हणून तर निवृत्तीचे जीवन जगणारे इनामदार गंभीर आजारी असल्याचेही वृत्त आले नाही. निधनाचेही वृत्त त्रोटक देऊन विषय संपवला गेला. गुन्हेगारीच्या विळख्यातून मुंबईला सुखरूप बाहेर काढणार्‍या या कर्तबगार अधिकार्‍याचे वारस निर्माण करण्याची संधी त्यांना मिळाली असती, तर मुंबई अधिक सुरक्षित झाली असती. निरपेक्ष वृत्तीने कर्तव्य बजावणार्‍या अशा अधिकार्‍याची कमतरता, हाच आजच्या समाज जीवनातील मोठा प्रश्‍न व समस्या आहे. नव्या पिढीतले अधिकारी, प्रशासक त्यांचे किती अनुकरण करून पुढे जातील, ठाऊक नाही; पण या निमित्ताने का होईना, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची आम्हाला गरज वाटते. कारण, अरविंद इनामदार गुन्हेगारीचा साक्षात कर्दनकाळ होते.