Responsive image

प्रासंगिक : लोकसंख्या विस्फोट, रोगराई आणि माल्थसचे भाष्य

By aslam.shanedivan | Publish Date: Jul 12 2020 8:11PM

- प्राचार्य डॉ. जे. के. पवार

11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या विस्फोट/इशारा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्त...

11 जुलै 1987 रोजी युगोस्लाव्हिया येथे जगातील 500 कोटीव्या मुलाचा जन्म झाला आणि जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येची गंभीरपणे दखल घ्यायला सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (‘युनो’च्या) लोकसंख्या निधी कार्यक्रम संस्थेने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जाहीर केला. आपापल्या राष्ट्रातील लोकसंख्या नियंत्रित ठेवावी व जगाचे त्यापासून रक्षण करावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो त्यामुळेच या दिवसास लोकसंख्या विस्फोट/लोकसंख्या इशारा दिन म्हणून संबोधले जाते. 20 वे शतक लोकसंख्येच्या द़ृष्टीने एक आगळे शतक मानावे लागेल कारण या शतकात जागतिक लोकसंख्या चौपटीने वाढली यापूर्वी इतिहासात लोकसंख्येत इतक्या वेगाने कधीच वाढ झाली नव्हती. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला जगाची लोकसंख्या सुमारे दीड अब्ज होती. तिच जगाची लोकसंख्या 31 ऑक्टोबर 2011 रोजी 7 अब्ज म्हणजे 700 कोटी झाली. 

जगाची लोकसंख्या दर मिनिटाला 176, दर तासाला 10,560 आणि दर दिवसाला 2,53,440 अशी वाढत आहे. अर्थात, सन 1800 मध्ये जगाची लोकसंख्या 1 अब्ज होती. त्याचे 2 अब्ज व्हायला 130 वर्षे लागली. तीन अब्ज व्हायला आणखी तीस वर्षे लागली मात्र पाच, सहा आणि सात अब्ज व्हायला प्रत्येकी बारा वर्षे लागली आहेत. त्यामुळेच आता जास्त धोका जाणवायला लागला आहे. जागतिक पातळी वरचा विचार केला तर, असे दिसून येते की, सर्वच देशांना वाढत्या लोकसंख्येचा धोका नाही. विकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या नियंत्रित, मर्यादित स्वरूपात आहे. विकसनशील देशांना मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे असंख्य समस्यांना समोरे जावे लागत आहे. म्हणूनच काही देशांतून लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत, तर काही देश लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देत आहेत. 

युरोप, ऑस्ट्रोलिया आणि उत्तर अमेरिकेच्या खंडातील राष्ट्रांनी आपली लोकसंख्या नियंत्रित केली आहे. त्यामुळे त्या राष्ट्रातील जीवनमान उंचावलेेले आहे. तेथील नागरिकांना दारिद्य्राची अन् रोगराईची फारशी झळ पोहोचलेली नाही. याउलट आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या खंडातील राष्ट्रांची लोकसंख्या अनियंत्रिपणे वाढत आहे. त्यामुळे या खंडातील देशात असलेल्या साधन सामुग्रीवर विपरीत परिणाम होत आहे. तेथील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत गरजा पूर्ण करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेथील जनता दारिद्य्र, उपासमार, अज्ञान आणि अनारोग्याच्या खाईत सापडली आहे आणि सर्वांचे एकच कारण आहे. ते म्हणजे लोकसंख्येची अनियंत्रित वाढ होय, विस्फोट होय.

थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी इ. स. 1798 मध्ये लोकसंख्येच्या संदर्भातील एक निबंध प्रकाशित केला त्याचे शीर्षक होते."An Essay on the principale of populastion as it attects the future improvement of society'  माल्थसच्या या निबंधावर अनेक अभ्यासकांनी जोरदार टीका केली. त्यानंतर इ. स. 1803 मध्ये माल्थसने निबंधाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. त्यानंतर अनेक देशांना भेटी दिल्या आणि तेथील माहितीचा सखोल अभ्यास करून इ. स. 1826 मध्ये त्या निबंधाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली. आपल्या निबंधात माल्थस म्हणतो ‘लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने म्हणजे 1:2:4:8;16:32:64 वाढेल तर अन्नधान्य वाढ ही अंकगणिती श्रेणीत म्हणजे 1:2:3:4:5:6 या प्रकाराने वाढेल’ यासाठीच माल्थसने लोकसंख्या नियंत्रणाकडे लक्ष वेधले. त्याने लोकसंख्या नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक व नैसर्गिक असे दोन प्रकार मानले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय माणसांच्या हातात आहेत. परंतु, नैसर्गिक उपाययोजनेमुळे मृत्यूदरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. 

माल्थसच्या मते ‘लोकसंख्या नियंत्रणाचे नैसर्गिक उपाय हे अतिशय भयंकर असतात. त्यामुळे मानवनिर्मित उपायानांच प्राधान्य दिले पाहिजे. मानवाने ते उपाय केले नाहीत तर लोकसंख्या नियंत्रणाचे कार्य आपोआप निसर्गाकडून केले जाईल. भूकंप, उपासमार, रोगराई, दुष्काळ व महापुरांमुळे लोकसंख्या नियंत्रण होईल.’

माल्थसच्या सर्वच मुद्द्यांवर अनेक अभ्यासकांनी पुराव्यासह टीका केली. माल्थसचा हा निराशावाद आहे हेही अनेकांनी स्पष्ट केले. मात्र, 11 जुलै हा ‘लोकसंख्या विस्फोट इशारा दिन’ म्हणून साजरा करताना गेल्या अनेक वर्षांतील नैसर्गिक संकटांची मालिका आपण विसरू शकत नाही. दुष्काळ, महापूर, त्सुनामी, संकटे, युद्धे आणि सध्या संपूर्ण जग व्यापून राहिलेले ‘कोव्हिड-19’ अर्थात कोरोनाचे संकट पाहता माल्थसचे भाष्य डोळ्यासमोर उभे राहते. माल्थसच्या सिद्धांतावरील सर्व टीका मान्य करूनही माल्थसने सांगितलेले लोकसंख्या नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय आपण विसरता कामा नयेत. किंबहुना, ते प्रतिबंधात्मक उपाय नव्या रूपात का असेना परंतु अमलात आणणे हीच आजच्या काळाची गरज आहे.