Responsive image

चिरस्थायी सकारात्मक बदलांची संधी

By arun.patil | Publish Date: May 24 2020 8:00PM

डॉ. मनोज पाटील

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यांचा परिणाम म्हणून अनेक बदलांची चर्चा सुरू आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी होऊन हवेचा दर्जा सुधारणे, संवाद वाढणे, घरगुती कचर्‍याचे संकलन व्यवस्थित होणे, सार्वजनिक परिवहन आणि स्वच्छतेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण होणे... हे आणि यासारखे अनेक मुद्दे या चर्चेमध्ये आहेत. यातले बरेचसे बदल हे तात्पुरते आहेत. लॉकडाऊननंतर पुन्हा पूर्वीसारखे होण्याची शक्यता खूप आहे; पण त्याच वेळी हे ही लक्षात येते की, काही स्थायी स्वरूपाचे बदलसुद्धा होण्याची शक्यता आहे. ते अवश्य होऊ देत!  आपल्याला ते सकारात्मक दिशेने नेण्याची संधी आहे, हे मात्र नक्‍की!

तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा द‍ृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे त्याचा वापर अधिक चातुर्याने आपण करू शकणार आहे. जे उपलब्ध आहे त्यालाच हव्या त्या पद्धतीने परिवर्तित करून वापरायला जाणार आहे. तसे प्रयोग आपण या काळात केले सुद्धा! जसे व्हेंटिलेटर ची कमतरता कमी पडणार, म्हटल्यानंतर विविध संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्हेंटिलेटर बनवले. अनेक संस्थांनी आणि घरोघरीसुद्धा संसर्ग वाढू नये यासाठी नवनवीन सुरक्षा साधनांची निर्मिती सुरू केली आणि या सर्व कसरतीमध्ये तीन वैशिष्ट्ये पाहायला मिळाली 1. उपलब्ध आहेत त्या गोष्टी वापरणे, 2. बाहेरून कोणत्या साधनांची मदत न घेणे आणि 3. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे वेस्टेज अथवा अपायकारक काहीही तयार होऊ न देणे.

दुसरीकडे प्रशासन जनतेसाठी राबत आहेत. प्रशासनाला व्यवस्थापनाची सवय लागली आणि जनतेला ते मान्य करायची सवय लागली हे काही कमी महत्त्वाचे नाही. या अनुभवाचा भविष्यातही निश्‍चित फायदा होईल. सेल्फ डिसिप्लिन्ड  सोसायटी,  सेल्फ ऑर्गनाईज्ड सोसायटी हा आपला खूप जुना भूतकाळही आहे आणि स्वप्नही आहे. ते आज आपल्या द‍ृष्टिपथात आहे. भविष्य काळामध्ये सरकार, आरोग्य आणि जीवनशैली या विषयावर अपरिहार्यपणे विचार करू लागेल. माध्यमे तसे करण्यासाठी त्याला भाग पाडतील. अर्थशास्त्र प्रामुख्याने या विषयाभोवती फिरायला लागेल. बेरोजगारी हा प्रश्‍न या प्रक्रियेतून सुटू ही शकतो. त्यासाठी आवश्यक असे कौशल्य आत्मसात करणे हे मात्र आपले कर्तव्य राहील. पूर्वी आपण हा विषय लादत होतो, आता या विषयाची मागणी होणार आहे.

योग्य त्या क्षेत्रांमध्ये योग्य ते प्रयत्न झाले तर हा कट्टरतेचा शाप आणि त्यातून आलेला दहशतवादाचा शाप दोन्हीपासून पण मुक्‍त होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर आपली सांस्कृतिक मूल्ये आणि धार्मिक तत्त्वे सामाजिक गरजांना अनुकूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर झालेला हल्ला,  2008 सालची जागतिक मंदी यासारख्या प्रसंगाने जगामध्ये खूप मोठे बदल घडवून आणले. 2020 सुद्धा एक असेच बदलाचे निमित्त आहे. जगातल्या कोणत्या देशाकडून काय घ्यायचे, कोणती गोष्ट कुठे वापरायची आणि कोठे वापरायची नाही यांचे परिमाण आता बदलायला हरकत नाही. आपण सर्वजण एकाच जगाचे घटक आहोत,  आपल्यामध्ये खूप विविधता असली तरीही ह्या जगाचे आरोग्य आणि विकास दोन्ही आपल्यालाच सांभाळायचे आहे. कोरोनाच्या संकटाने यापूर्वी अनेक कारणाने निर्माण झालेल्या सीमारेषा संपवल्या आहेत. समान शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी जग एकत्र आले आहे.  लढण्याच्या पद्धतीमध्ये, लढाईची सुरुवात करण्यामध्ये फरक असू शकेल. परंतु, लढाईची साधने आणि शस्त्रे समान आहेत. समान शत्रूसाठी अखिल मानव जात एक होणे  हे आजपर्यंत केवळ भाषणांमध्ये मांडण्याचे आदर्श होते ते आज वास्तव आहे. 

आरोग्य सेवा ही अधिक ‘इंटिग्रेटेड’ होण्याची ही वेळ आहे. आजार बरे करण्याचे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत असताना, प्रतिबंधात्मक तंत्रज्ञानाला विकसित व्हावे लागेल. व्यक्‍तीची रोगप्रतिकार शक्‍ती, उपचार करत असताना व्यक्‍तीच्या प्रकृतीचा विचार, आजाराच्या प्रसारामध्ये भौगोलिक वैशिष्ट्यांचा विचार या विषयावर अधिक काम करावे लागेल. खरे तर वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन हा विषय शिकवला जातो; पण त्यानंतरचे शिक्षण आणि त्यानंतरची व्यवसायिक गरज त्यामुळे तो विषय मागे पडतो, असे आता होऊन चालणार नाही. 

सीमेवर लढणारे सैनिक ज्याप्रमाणे सर्वांसाठी आदरणीय  आहेत,  त्याचप्रमाणे आपल्या जीवावर उदार होऊन डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणारे सर्वजण तितकेच आदरणीय आणि शूरवीर आहेत. याची जाणीव ठेवून गेल्या काही दिवसांमध्ये बर्‍याचदा, बर्‍याच नागरिकांनी, बर्‍याच डॉक्टरांना फोन करून तशी भावना व्यक्‍त केली आहे. स्वभाविकच त्याचा सकारात्मक परिणाम डॉक्टरांच्या मानसिकतेवर झालेला असणार. समाजामध्ये परस्परांविषयी असे सकारात्मक भाव असणे सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी अकल्पित परिणाम घडवून आणणारे ठरू शकतात.

संयुक्‍त कुटुंबाकडून एकल कुटुंबाकडे आणि एकल कुटुंबातून व्यक्‍तिकेंद्रित होत चाललेल्या समाजाला विचार करण्याची वेळ आली आहे. घरातूनच काम करता करता पालक आपल्या मुलांना घरच्या घरीच वेगवेगळ्या गोष्टी शिकवू लागले. चार लोकांच्या आणि सहा लोकांच्या मध्ये 24 तास घालवणे 4-8 दिवसांमध्येच अवघड जाऊ लागले,  तेव्हा शेजार्‍यांशीही संवाद होऊ लागला. थोडक्यात, अतिस्वकेंद्रित आणि बाजारकेंद्रित  झालेला माणूस, परिवार आणि परिसर यांच्याशी जोडलेला राहू लागला.

कधी मुले स्वतःच शिक्षकांची आठवण करून त्यांना फोन करू लागले, तर कधी शिक्षकांनी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर गृहपाठ द्यायला सुरुवात केली. यातून भविष्यकाळाची एक नवीन पद्धती हळूहळू तयार होईल. ज्यामध्ये शिक्षकांच्या इतकीच भूमिका पालकांची गृहीत धरली जाईल. कृतीवर आधारित शिक्षण आणि उपक्रमावर आधारित गुणवत्ता या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरावी. 

छोट्या-मोठ्या शहरांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी बाबत मोठा बदल होत चालला होता. स्वयंपाक घरांची भूमिका गौण होत चालली होती. पाककला बिझनेससाठी पूरक ठरली तरी आरोग्यासाठी मारक ठरत चालली होती; पण आज आपण पाहिले तर दवाखान्यामधली गर्दी 50 ते 90 टक्केइतकी कमी झाली आहे. कोरोना व्यतिरिक्‍त अन्य दुखण्यासाठी एक तर जागाच उरली नाही, नाहीतर जे आजार केवळ पथ्य पाण्याने बरे होतात तसे बरे होण्यासाठी त्यांना संधी मिळत आहे. पटकन बरे होऊन कामाला लागायचे दिवस आता नाहीत. त्यामुळे औषधांचा भडिमारही नाही. भयाचा बाजारही नाही. तपासणीचे चक्रही नाही. केवळ इमर्जन्सी रुग्ण,  हॉस्पिटल्समध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे स्पेशालिस्ट डॉक्टरांना खर्‍या अर्थाने स्पेशालिस्ट असल्याची जाणीव होते आहे; अन्यथा आपली आर्थिक क्षमता आहे म्हणून स्पेशालिस्टकडे जाणे, हे आता बंद झाले आहे.

कमिशन, मार्केटिंग, पॅकिंग यावर केंद्रित  झालेला आपला व्यापार आता, उत्पादन, संरक्षण व उपयुक्‍तता केंद्रित व्हावा. केवळ उत्पादनावर आधारित असलेली आपली शेती प्रक्रिया आणि पॅकिंग याची जोड त्याला मिळाली आणि सेवा क्षेत्रासाठी तर आता सुवर्णकाळ निर्माण आहे. अर्थव्यवस्थेला गती यावी म्हणून यापुढे काही योजना आखल्या जातील, विशिष्ट आर्थिक क्षेत्रांची वाढ व्हावी म्हणून तिला काही सवलती आणि टॉनिक ही दिले जाईल. अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक व्यवस्थेला मिळालेला हा सुट्टीचा काळ नव्याने सुरुवात करताना जुन्या चुका टाळून योग्य दिशेने नेण्यासाठी उपयुक्‍त ठरावा.