भाग्याचे भाग्य, उदो पैं दैवयोगें। तें पुंडलिकासंगे भीमातटीं॥
ध्यान, मनन, एक करितां सम्यक। होय एकाएक एक तत्त्व॥
उदो स्तुमेळें ब्रह्म न मैळें। भोगिती सोहळे प्रेम भक्त॥
निवृत्ती निवांत, विठ्ठल सतत। मात हरिविण॥
संत निवृत्तीनाथांच्या दृष्टीनं पुंडलिकाच्या भक्तीवर नि त्याच्या माता-पित्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन पांडुरंगाच्या रूपानं परमेश्वर त्याला दर्शन देण्यासाठी पंढरीला अवतरला, हा प्रसंगच अभूतपूर्व आहे. असं कधी घडेल, अशी कल्पना तरी कुणी केली होती का? पांडुरंगाच्या या ‘अवतरणा’मुळे भाग्याचंच भाग्य उजळलं आहे व हा दैवयोग केवळ अनन्यसाधारण आहे, त्यामुळं आता पुंडलिकाबरोबरच, इतर भक्तगणही, सतत पांडुरंगाचं ध्यान, स्मरण नि भक्ती करतील. मलाही मनःशांती मिळेल. हरिनामाशिवाय दुसर्या कुठल्याही गोष्टीचं भानच राहणार नाही, इतके आम्ही सर्वजण या भक्तीच्या सोहळ्यात रंगून जाऊ, तल्लीन होऊ.