Responsive image

गाथा कोरोनाची : चीनमधील कोरोनाचे भाऊबंद

By aslam.shanedivan | Publish Date: Jul 12 2020 8:11PM

- सचिन बनछोडे

कोरोना व्हायरसच्या आधी जगात अखेरची फ्लू महामारी 2009 मध्ये आली होती. ही महामारी होती ‘स्वाईन फ्लू’ची. मेक्सिकोतून सुरू झालेली ही महामारी अनुमानाइतकी घातक ठरली नाही. मात्र, सध्याच्या कोरोना विषाणूने जगात एक कोटीपेक्षाही अधिक लोक संक्रमित झाले आहेत. अशा स्थितीत चीनमध्ये आणखी एका विषाणूचा छडा लागला आहे जो महामारीला कारणीभूत ठरू शकतो. फ्लू व्हायरसचे हे नवे स्ट्रेन डुकरांमध्ये आढळले असून ते मानवात संक्रमित होऊ शकते. तसेच, ते रुप बदलून म्हणजेच ‘म्युटेट’ होऊन मानवाकडून मानवामध्ये फैलावू शकते. या विषाणूचे नाव ‘जी 4 इ ए एच1एन1’ असे आहे. सध्या तरी याबाबत काळजी करण्यासारखी स्थिती नसली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज’नुसार हे नवे स्ट्रेन असल्याने माणसात त्याविरुद्ध लढण्याची क्षमता नसेल किंवा कमी असू शकेल. त्यामुळे डुकरांमधील या विषाणूकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळातच चीनमध्ये हंता विषाणूनेही लक्ष वेधून घेतले. हा एका अशा समूहातील विषाणू आहे जो विशेषतः वस्तू कुरतडणार्‍या (रोडंटस्) उंदीर व खारीसारख्या प्राण्यांमधून फैलावतो. हा विषाणू अशा रोडंटस्ना संक्रमित करीत असला तरी त्यामुळे त्यांच्यामध्ये रोग निर्माण होत नाही, हे विशेष. अमेरिकेतील असा विषाणू ‘न्यू वर्ल्ड हंता व्हायरस’ आणि युरोप व आशियातील ‘ओल्ड वर्ल्ड हंता व्हायरस’ या नावाने ओळखला जातो. त्यांच्यापासून अनुक्रमे ‘हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम’व ‘हेमोर्‍हॅजिक फिव्हर वुईथ रेनल सिंड्रोम’ नावाचे आजार होतात. यापैकी ‘पल्मोनरी सिंड्रोम’ अधिक घातक असतो. या दोन्ही आजारांवर विशिष्ट उपचार पद्धत नाही. हंता व्हायरसचे अनेक प्रकार असून ते वेगवेगळ्या प्रजातीच्या रोडंटस्मध्ये फैलावतात. विषाणू संक्रमित उंदराच्या मल, मूत्र व लाळेच्या संपर्कात आलेल्या मानवात तो संक्रमित होतो. हा विषाणू मानवातून मानवात संक्रमित होण्याचा धोका जवळ जवळ नसतो. मात्र, त्याचे संक्रमण अत्यंत घातक ठरते. या विषाणूला ‘हंता’ हे नाव दक्षिण कोरियातील ‘हंतान’ या नदीवरून पडले असले तरी या विषाणूचा प्रादुर्भावही सुरुवातीला चीनमध्येच झाला होता. 1931 मध्ये चीनमध्येच त्याला पहिली क्लिनिकल ओळख मिळाली. ‘सार्स-कोव्ह-2’ या नव्या कोरोना विषाणूने जगाला घातक विषाणू आणि त्यांचे संक्रमण याबाबत कायमचा लक्षात राहील असा धडा शिकवलेला आहे. त्यामुळे चीनमध्ये डुकरांच्या शरीरात आढळलेला नवा विषाणू असो किंवा हंता विषाणू असो, सावधगिरी बाळगणे हे गरजेचेच बनले आहे.