Mon, Jul 06, 2020 05:43होमपेज › संपादकीय › स्वच्छ भारत अभियान ›

स्वच्छ भारत अभियान

By ramesh.patil | Publish Date: Oct 04 2017 1:35AMअग्रलेख

सोमवारी ‘स्वच्छ भारत अभियान’चा गवगवा देशातल्या प्रत्येक वाहिनीवर चालू होता. एकप्रकारे ती अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण, यापूर्वी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीला स्वच्छ भारत संकल्पनेशी जोडण्यापूर्वी ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ या धुना वाजवण्यापलीकडे या दिवसाचे फारसे महत्त्व नव्हते. पण मागल्या तीन वर्षांत निदान आपण स्वच्छ, निरोगी जीवन जगावे, तरी आपण गांधींचे अनुकरण केले, अशी एक धारणा निर्माण होण्यास हातभार लागला आहे. मात्र, हे काम किंवा ही मोहीम किती दूरगामी टप्प्याची व अवघड काम आहे, त्याचा अनेकांना अंदाजही आलेला नाही. ही मोहीम उपकार वा त्याग म्हणून चालवायची नसून, आपलेच घरचे काम म्हणून करायची आहे, याची जाणीव हळूहळू 
समाजमनात झिरपू लागली आहे. तो जाणिवेचा पाझर किती तळागाळापर्यंत जायला हवा, त्याचे उत्तर तामिळनाडूतील एका मातेने अतिशय क्रूर पद्धतीने दिलेले आहे. आपल्या पोटच्या बाळाला डेंग्यूसारखा जीवघेणा आजार जडल्यावर उपचाराला पैसे नाहीत, म्हणून त्या मातेने दोघांचाही जीव घेऊन या जगाचा निरोप घेतला. आता अशी घटना समोर आली, मग सरकार व शासकीय आरोग्य व्यवस्थेवर दुगाण्या झाडण्याचे निमित्त मिळत असते. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर परिसरात मेंदूज्वराने बालकांचे लागोपाठ मृत्यू झाल्यावर किती गदारोळ चालला होता, त्याचा आवाज अजून हवेत विरलेला नाही. त्यात योगी आदित्यनाथ यांच्या माथी खापर फोडण्याची स्पर्धाच रंगली होती.

आता महिनाभरात बहुधा तो विषय निकालात निघाला असावा. अन्यथा, कुठल्याही वाहिनीला गोरखपूर का आठवेनासे झाले असते? अर्थात, कोणाला आठवत नसेल वा बातमीत झळकत नसेल, म्हणून तिथल्या मेंदूज्वराचे बळी आटोक्यात आले, असे मानायचे कारण नाही. कारण, तिथले हे साथीचे रोग व त्याचे बळी हा सालाबादचा विषय झालेला आहे. तसे होत राहिले कारण स्वच्छ, निरोगी जीवन ही गोष्टच कोणाच्या डोक्यात इतकी वर्षे आली नाही. आरोग्य म्हणजे उपचार नसल्याची कल्पना कोणी त्या नागरिकांच्या डोक्यात घालण्याचे कष्ट घेतले नाहीत. स्वच्छ भारत ही मोहीम गांधीजींच्या स्मरणार्थ असली, तरी ती जनजीवनातील आरोग्याशी निगडीत बाब आहे. उपचार हे आजारी पडल्यानंतरची अगतिकता असते आणि निरोगी आरोग्यदायी वातावरण ही जीवनावश्यक बाब असते. हे सत्य आहे, म्हणूनच पंतप्रधानांच्या या घोषणा वा मोहिमेचे यशापयश हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीशी संबंधित नसून, एकूण देशाच्या आरोग्याशी निगडित असा विषय आहे. कारण, ही मोहीम रोगमुक्‍तीची आहे आणि सरकारला रोगराई होत नाही. तिची बाधा सामान्य माणसाला होत असते.

तामिळनाडू राज्यातील निमक्‍कल जिल्ह्यातील बेलुकुरूची या गावात एका बालकाला डेंग्यूची लागण झाली. त्याला उपचारार्थ त्याची माऊली एका खासगी इस्पितळात घेऊन गेली आणि उपचारासाठी आवश्यक पैसे नसल्याने तिला वैफल्य आले. पैशांअभावी तिला आपल्या मुलाच्या यातना व मरणासन्‍न वेदना थांबवता येत नसल्याने ती निराश झालेली होती. त्या रात्री तिने पोटच्या गोळ्याला घेऊनच एका विहिरीत उडी घेऊन इहलोकीची यात्रा संपवली. आता सगळे तिच्या मृत्यू वा आत्महत्येविषयी हळहळ व्यक्‍त करतील आणि गरिबाला या देशात उपचारच मिळत नाही, म्हणून टाहो फोडून रडतील. मात्र, उपचाराची गरज कुठून व कशामुळे निर्माण झाली, त्यावर कोणी बोलणार नाही. मुळातच त्या बालकाला डेंग्यूची लागण झाली नसती, तर उपचार आवश्यक ठरले नसते, की त्यासाठी पैशांअभावी वैफल्यग्रस्त होण्याचा प्रसंग त्याच्या जन्मदातीवर आला नसता. म्हणजेच प्राणघातक रोगाची लागण ही खरी समस्या आहे आणि ती घनकचरा व रोगट वातावरणाची निपज आहे. स्वच्छतेचा तिथे थेट संबंध येतो. उपचार कितीही महाग असले तरी स्वच्छता अजिबात महाग गोष्ट नाही. स्वच्छ राहणे ही श्रीमंतांची मक्‍तेदारी असू शकत नाही. आपला परिसर स्वच्छ राखणे व त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे, हे कुणा श्रीमंतांसाठीचा राखीव अधिकार नाही. पैशाची टंचाई त्यासाठी कारण असू शकत नाही; पण त्याची शिकवणच जर सामान्य माणसाला देण्याचा कधी प्रयत्न झालेला नसेल, तर रोगराई ही शाश्‍वत आणि उपचार हे हंगामी होऊन जातात. मोठी गावे व शहरातील वाढता कचरा व त्याची विल्हेवाट लावण्यातील दिरंगाई; ही आरोग्याची खरी समस्या झालेली आहे.

एकूण नागरी जीवनातील बेशिस्त हा त्याचा पोशिंदा झाला आहे. कुठेही कचरा टाकणे, घाण करणे याविषयी बेपर्वाई आपल्या निरोगी जीवनातील खलनायक झालेला आहे. त्यातून मग दाट गरीब, गलिच्छ वस्त्यांमध्ये रोगराई पसरवणार्‍या जीवाणू, विषाणूंची मोठी पैदास करणारे उकिरडे निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांना पाठीशी घालून आरोग्य व्यवस्था किंवा शासनावर टीका करण्यातून सामान्य लोकांची अधिकच दिशाभूल होत असते. आरोग्याविषयी त्यांना अधिक गाफील केले जाते आणि अशा लोकांना रोगराईच्या खाईत अधिकच लोटले जात असते. ती माता व तिच्या बालकाचा नुसत्या गरिबीने बळी घेतलेला नाही वा तिला आत्महत्येला प्रवृत्त केलेले नाही. परिसर स्वच्छ राखण्याविषयीच्या सार्वजनिक अजाणतेपणाने तो अन्याय केलेला आहे. आपले घर नव्हे तर अवघा परिसर स्वच्छ राखण्याविषयीच्या अजाणतेपणाने कोट्यवधी गरीबांना रोगराईच्या हवाली केले जाते. मग मरणाच्या कडेलोटावर आणून उभे केले जात असते; पण त्यातला खरा खलनायक समजावण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत, ज्याला जग आज ‘स्वच्छ भारत अभियान’ म्हणून ओळखते.