से नो टू ॲडिक्शन

Last Updated: Mar 02 2020 3:45PM
Responsive image


व्यसन म्हणजे पाप, असे वाटणारी, घरच्यांना घाबरणारी तरुणाई आता बदलली आहे. यापूर्वी लपून-छपून व्यसन करणार्‍या तरुणाईला आता कशाचेच भय राहिले नाही अशीच काहींशी परिस्थिती सध्या दिसते. यामुळे अनेक ठिकाणी खुलेआम सिगारेटचा धूर सोडत उभी राहणारी मुले दिसतात. अमली पदार्थांचे सेवन असो, धूम—पान असो अथवा मद्यपान असो, या सर्वच गोष्टी त्यांच्यासाठी जणू स्टाईलच बनल्या आहेत.

व्यसनाच्या आहारी जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक कारणांनी तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. कॉलेजची मुले-मुली तर सोडाच पण अगदी नववी - दहावीची मुलांतील वाढती व्यसनाधीनता सार्‍यांच्याच चिंतेचा विषय होत चालली आहे. शहरातील निर्जनस्थळे हे त्यांचे अड्डे बनू लागले आहेत. कॉलेज, शाळा चुकवून त्या ठिकाणी जमायचे आणि झुरके मारायचे हा जणू त्यांच्या दिनचर्येचाच भाग बनला आहे. या झुरक्यांचा घातक परिणाम थेट त्यांच्या शरीरावर होत आहे, याची पुसटशी कल्पनादेखील त्यांना नसते. कधी व्यसनाधीन पालक, कधी चित्रपटामधील हिरोची स्टाईल, त्यांचे अनुकरण करताना अनेकजण कधी धूम—पान, मद्यसेवनाच्या आहारी जातात हेच समजत नाही.

  सिगारेट ओढल्यानंतर कसे वाटते या उत्सुकतेपोटी एकदा ओढलेली सिगारेट त्यांच्या जीवनाचा एक भाग कधी बनते हे त्यांना कधीच कळत नाही. व्यसनाधिनतेची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने वैद्यकीय व सामाजिक कारणासोबतच तरुणाई सध्या स्टाईल मारण्यासाठी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे अनेक उदाहराणांवरून समोर येत आहे. मेंदूमध्ये काही विशिष्ट केंद्र असतात. यामुळे संवेदना समजतात.

 एखाद्या गेममध्ये जिंकल्यानंतर निर्माण होणारी आनंदाची भावना डोपामिन आणि स्टेरोटोनिन न्यूरो ट्रान्समीटरच्या माध्यमातून मेंदूतील या केंद्रांकडे पोहोचवली जात असते. अमली पदार्थांचे सेवन, जुगार, गेमिंगसारख्या सवयींमुळे मेंदूमधील डोपामिनचे प्रमाण वाढते. यामुळे आनंदाच्या लहरी मेंदूकडे पोहोचवल्या जातात. या गोष्टींच्या वारंवार सेवनामुळे शरीराला त्याची सवय लागते. असे मानसोपचार तज्ज्ञ व्यंकटेश पोवार यांचे म्हणणे आहे.

मुलांना शाळा, कॉलेजमध्येच व्यसनाची सवय लागण्याची शक्यता अधिक असते. बसस्थानक परिसरामध्ये उनाडक्या करत बसणे, महाविद्यालच्याकट्ट्यावर गप्पा ठोकत बसने, थर्टी फर्स्ट वा इतर पार्टी करणे अशा प्रकाराने तरुण पिढी व्यसनाच्या भोवर्‍यात अडकताना दिसत आहे. अशा व्यक्तींच्या संपर्कात वारंवार आल्याने एखादा निर्व्यसनीयुवकदेखील व्यसनाकडे ओढला जातो आणि कालांतराने व्यसनाधीन होतो. यामुळे मुळात मुलांना चांगले आणि वाईट याची जाणीव करून द्यायला पालक कुठे तरी कमी पडत आहेत का? असा प्रश्न आज उपस्थित होऊ लागला आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा मित्र परिवार कसा आहे. ते काय करतात हे जाणून घेतले पाहिजे व त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे.त्याचे समोपदेशनही केले. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाहीघेतला
पाहिजे.

से नो टू ॲडिक्शन

घरातील आई-वडील असो वा वयोवृद्ध कोणी असो, त्यांच्या पाया पडून घरांचा उंबरठा ओलांडणारी पिढी आता फार दिसत नाही. काही घरांत असे संस्कार दिसतही असतील; पण त्याचे प्रमाण पाहता, नव्या पिढीला हे सगळे नकोसे वाटते, ती आपल्याच स्टाईलमध्ये जगायचा प्रयत्न करतेय. प्रत्येक गोष्टींची त्यांची एक स्टाईल तयार होते, त्यात व्यसनही मागे राहिलेले नाही. यामुळेच अगदी नववीदहावीतील मुलेही सिगारेटचे झुरके ओढताना दिसतात. त्यातूनच पुढे जाऊन ते अमली पदार्थांच्या विळख्यात असे काही अडकून जातात की नंतर त्यांचे जगणे फारसे सुसह्य होत नाही, अशावेळीत्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्नांची पराकष्ठा सुरू होते. मात्र, अनेकदा त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून कितीही बिझी असा, आपल्या मुलांशी संवाद साधा. कमी वयातच मुले व्यसनाच्या आहारी चालली आहेत. त्‍यांचे ॲडिक्शन वाढतच आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संवाद साधत पालकांनाही आता 'से नो टु ॲडिक्‍शन' म्‍हणण्‍याची गरज आहे.