आनंदाने जगा!

Last Updated: Mar 02 2020 3:24PM
Responsive image
आनंदाने जगा


सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका खेडूत मुलीने प्रश्न विचारला, ‘भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?’ तो म्हणाला, पुढचे देश जिंकीन आणि मजल-दरमजल असेच जिंकत
मी जगज्जेता होईन.’ मग काय करणार? हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने सिंकदरला विचारला. यावर तो म्हणाला,‘मग काय, निवांतपणे जगेन.’ यावर ती मुलगी हसत म्हणाली, मग आतापासूनच का निवांत नाही जगत तुम्ही? यातून सिकंदरला काय कळलं माहीत नाही; पण खरंच ही गोष्ट बरेच काही सांगून जाते. आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय. ती पुढे कधीतरी निवांत जगू या भाबड्या आशेवर. बर्‍याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपलं वळण कधी येऊन गेले याचे भान राहिलेले नाही. कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणाला तरी जास्त संधी मिळणारच, कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच हे आपण विसरत चाललो आहोत. तेव्हा आपल्या स्वाभाविक ध्येयावर व जगण्यावर केंद्रित करावे. आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत राहावे. केवळ पुढे एकटे राहण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का?  यासाठी पहिल्यांदा गरज व चैन यात फरक करणे शिका. इतर धावताहेत म्हणून आपणही धावणे ठीक नाही.

आपले जगणे ही सर्वसमावेशक, चौफेर असेल तर ते सुखकर ठरेल. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतीक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाऊ देऊ नका ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या. स्टीव्ह जॉब्स यांनी म्हटल्याप्रमाणे, हरवलेल्या वस्तू गवसतील, पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोहोचल्यानंतर ‘निरोगी कसं जगावं’ हे पुस्तक वाचून काय उपयोग? या गोष्टीचा प्रत्येकाने विचार केला तरच जगणे नक्कीच सुखकर होईल. - विजयलक्ष्मी कुंभार, राजाराम कॉलेज,