Fri, Dec 13, 2019 18:00होमपेज › Youthworld › खुशखबर; वाहन परवान्यासाठी शैक्षणिक अट रद्द

खुशखबर; वाहन परवान्यासाठी शैक्षणिक अट रद्द

Published On: Jun 19 2019 12:53PM | Last Updated: Jun 19 2019 12:53PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

वाहन परवान्यासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात नवी नियमावली जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती लायसन्स काढण्यासाठी अर्ज करू शकते. त्याला किमान शैक्षणिक पात्रतेची गरज उरणार नाही. १९८९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या नियम ८ अंतर्गत लायसन्ससाठी आठवी उत्तीर्ण असणे अनिवार्य होते.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. अनेकजण केवळ आठवी उत्तीर्ण नसल्याने त्यांना वाहन चालविण्यासाठी आवश्यक लायसन्स मिळत नव्हते. त्यामुळे वाहन चालविण्याच्या क्षेत्रात अधिकृतपणे काम करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधींना मुकावे लागत होते. यासाठीच ही अट काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात सुमारे २२ लाख वाहनचालकांचा तुटवडा आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासालाही खीळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक मंत्रालयाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. 

केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम ८ मध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही वाहतूक मंत्रालयाने सुरू केली आहे. या संदर्भातील शासन आदेशही लवकरच जारी केला जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.