उकडीचे मोदक बनविण्‍याची सोपी रेसीपी

Published On: Aug 31 2019 12:53PM | Last Updated: Aug 31 2019 12:52PM
Responsive image
 उकडीचे मोदक संग्रहित छायाचित्र


मुंबई : पुढारी ऑनलाईन

गणपती उत्‍सव तोंडावर आला आहे. सगळीकडे लाडक्‍या बाप्‍पाच्‍या आगमनाच्‍या तयारीस  सुरुवात झाली आहे. पण या सगळ्‍यात आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पाला खूश करण्‍यासाठी त्‍याचे आवडते उकडीचे  मोदक घरी बनवायला विसरु नका. त्‍यासाठी जाणून घेऊयात उकडीच्‍या मोदकांची रेसीपी.....

उकडीचे मोदक बनविण्‍यासाठी लागनारे साहित्य :

१ मोठा नारळ, किसलेला गूळ, २ कप तांदूळाचे पिठ, वेलचीपूड, मिठ, तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप.

उकडीचे मोदकाची कृती :

१. सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळल्‍या नंतर वेलची पूड घालावी. गूळाऐवजी साखर वापरु शकता. पण गूळ आरोग्‍यासाठी चांगला असतो. तसेच या सारणात आपण ड्रायफ्रूटचा वापर करु शकतो. 

२.  मोदकाच्‍या आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी  जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे, ढवळावे. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.

३.  परातीत तयार उकड काढून घ्यावी. ही उकड म्‍हणजे पीठ व्यवस्थित मळून घ्यावे लागते. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी. एकही गाठ राहणार याची काळजी घ्‍यावी.

४. उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. पारी बंद करताना मोडणार नाही याची काळजी घ्‍यावी.

५. मोदकांना वाफवण्यासाठी चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात ३-४ भांडी पाणी उकळावे. चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला पुरेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून १५ ते २० मिनीटे वाफ काढावी. त्‍यानंतर थंड जाल्‍यानंतर मोदक हळुवार बाहेर काढावेत. 

अशाप्रकारे आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पासाठी घरी बनवा उकडीचे मोदक.