Sun, May 26, 2019 14:49होमपेज › Youthworld › World Sleep Day 2019 : आज झोपा काढण्‍याचा दिवस

World Sleep Day 2019 : आज झोपा काढण्‍याचा दिवस

Published On: Mar 15 2019 11:26AM | Last Updated: Mar 15 2019 11:15AM
'वर्ल्ड स्लीपिंग डे' निमित्त जाणून घेऊयात चांगल्‍या झोपेचे फायदे व अपुर्‍या झोपेमुळे शरीरास होणारे तोटे तसेच चांगल्या झोपेसाठीचे उत्तम उपाय.....

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

आज १५ मार्च म्हणजेच 'वर्ल्ड स्लीपिंग डे' शब्‍दश: अर्थ घ्‍यायचा म्‍हणजे आज झोपा काढण्‍याचा दिवस. उत्तम आरोग्‍यासाठी चांगली झोप महत्‍त्‍वाची आहे. दररोजच्‍या धावपळीत पुरेशी व शांत झोप मिळणे कठीण झाले आहे. मानवाला पुरेशा प्रमाणात झोप ही आवश्यक असते. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो. वेळेवर झोपून पहाटे उठणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बर्‍याच जणांना खूप जास्त वेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. लहान मुलांना आणि किशोर अवस्थेतील मुलींना शरीराच्या वाढीसाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. आज १५ मार्च म्हणजेच 'वर्ल्ड स्लीपिंग डे' निमित्त जाणून घेऊयात चांगल्‍या झोपेचे फायदे व अपुर्‍या झोपेमुळे शरीरास होणारे तोटे तसेच चांगल्या झोपेसाठीचे उत्तम उपाय.....

चांगल्या झोपेचे फायदे :

 पचन तंत्र योग्य राहते. वजन नियंत्रित राहते. शरीर आणि मन प्रफुल्लित राहते. एकाग्रता वाढते. मन चिंतामुक्‍त राहते. डोकेदुखी आणि अंगदुखी होत नाही. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वजन संतुलित राहते आणि व्यक्‍तीला प्रफुल्लित ताजेतवाने वाटते. 

चांगल्या झोपेसाठी उत्तम उपाय : 

१. झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्याने धुवावेत. पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करावे. 

२.कच्चा कांदा खाल्ल्याने छान झोप लागते.

 ३. रात्री कोमट दूध प्यावे. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्यास त्याने शांत झोप लागते. 

४. मन शांत ठेवा. मनात येणारे वाईट विचार काढून टाका, दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याविषयी विचार करावा. 

५. रात्री जेवल्यानंतर १० मिनिटे शतपावली अवश्य करावी. त्यामुळे झोप चांगली येईल. संध्याकाळी योगासने केल्यास झोप चांगली लागण्यास मदत होईल. 

६. इलेक्ट्रॉनिक साधने झोपण्यापूर्वी लांब ठेवून द्यावीत. 

७. चांगले संगीत ऐका आणि चांगली पुस्तके वाचा. त्यामुळे झोप येण्यास मदत होईल.

८.  शक्यतो रात्री बाहेर जेवणे टाऴावे. हलका आहार घेणे उत्तम. झोपण्यापूर्वी 3 तास जेवण करून घ्यावे. दिवसा झोपण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न करावा. 

अपुर्‍या झोपेचे तोटे

१. विसराळूपणा 

 झोपताना शरीर आराम करत असेल तरीही मेंदू मात्र जागरूक असतो. आपल्या मेंदूने जी अल्पकालीन स्मृती जतन करून ठेवलेल्या असतात त्या दीर्घकालीन स्मृतींमध्ये साठवण्याचे काम मेंदू करत असतो. मग, जेव्हा आपण जागे होतो तेव्हा अल्पकालीन स्मृती आणखी आठवणी साठवण्यास सज्ज होतात. जेव्हा झोप अपुरी राहते तेव्हा मेंदूच्या या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यातून मग विसराळूपणा येऊ लागतो. 

२.अपुर्‍या झोपेचा मेंदूवर परिणाम

कॉम्प्युटरवर एक्सेल शीटवर काम करता करता ग्राहकाशी बोलणे हे आपण सर्वच जण करतो. कारण, बहुतांश कामांमध्ये एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन-तीन कामे करावी लागतात किंवा एकाच वेळी दोन-तीन भूमिका साकाराव्या लागतात. या गोष्टींचे महत्त्व नोकरीच्या ठिकाणी असले तरी मेंदूसाठी इतके जास्त नसते. जेव्हा आपण सातत्याने एकाच वेळी अनेक कामे करतो म्हणजे मल्टिटास्किंग करतो तेव्हा मेंदू बंद होतो आणि झोप पुरेशी झाली नसेल तर मात्र मेंदू आपल्या कल्पनेपेक्षाही लवकर बंद होतो. 

३.मनोवस्था 

 ज्या व्यक्तीची झोप अपुरी होत असेल तर व्यक्ती एखाद्या प्रसंगामध्ये भावनिकदृष्ट्या किंवा नकारात्मकदृष्ट्या व्यक्त होऊ शकते. मेंदूच्या ज्या भागात राग, नैराश्य यासारख्या भावना नियंत्रित होतात त्या भागाचे कार्य होण्यासाठी झोप पूर्ण होणे फार गरजेचे असतात. अपुरी झोप झालेली व्यक्ती चिडचिडी, भांडकुदळ होते आणि सहकर्मचारी म्हणून कोणालाही नकोशी वाटते.

४. थकवा 

आपण जेव्हा झोपतो तेव्हा मेंदू काही संप्रेरके सोडत असतो. त्यातील काही संप्रेरके शरीराची अन्नग्रहण करण्याची क्षमता नियमित करतात. आपण पुरेशी व्यवस्थित झोप घेतली तर ही हार्मोन्स आपल्यासाठी चांगले काम करतात आणि त्यामुळेच दुसर्‍या दिवशीही आपण ताजेतवाने राहतो. त्यामुळेच सात तासांची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. झोप पूर्ण झाली तर दुसर्‍या दिवशी आपण नीट अन्नसेवन करू शकतो. भूक आणि झोप यांची काळजी घेत योग्य सांगड घातली तर कामही व्यवस्थित करू शकतो.

शांत झोप ही मेंदूच्या व शरीराच्‍या दृष्टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे माहिती साठवून ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे रात्रीची जागरणे करण्यापूर्वी विचार करा. त्याचा कामावर परिणाम होतो. कामाच्या ठिकाणी आळसटल्यासारखे राहणे नक्कीच नुकसान करू शकते.