Tue, Jun 02, 2020 22:08होमपेज › Youthworld › कॅम्पसमध्ये २० ऑगस्टपासून आचारसंहिता

कॅम्पसमध्ये २० ऑगस्टपासून आचारसंहिता

Published On: Aug 01 2019 5:15PM | Last Updated: Aug 01 2019 5:15PM
मुंबई : प्रतिनिधी 

विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालय कॅम्पसचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाने बुधवारी जाहीर केला आहे. सर्व प्रवर्गासाठी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आचारसंहिता 20 ऑगस्टपासून लागू  तर  30 ऑगस्टला मतदान आहे. 

तब्बल 25 वर्षे बंद झालेल्या विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका पुन्हा सुरू  करण्यासाठी नव्या विद्यापीठ कायद्याने हिरवा कंदील दिल्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात या निवडणुका होत आहेत. महाविद्यालयीन निवडणुकांना राजकीय स्वरूप आल्याने व हिंसाचाराचे गालबोट लागल्याने त्या बंद झाल्या होत्या आणि 1991 नंतर गुणवत्तेच्या निकषांवर विद्यार्थी प्रतिनिधींची निवड होत होती. यंदा मात्र कॅम्पसचा आखाडा या निवडणुकांनी चांगलाच रंगणार आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक होईल तर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेसाठी वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक येईल. या निवडणुकीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार चार तासांची मतदानाची वेळ जाहीर करायची असून मतदानानंतर त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे.