Tue, Oct 24, 2017 16:55



होमपेज › Youthworld › माणूस मारला गं, माणूस मारला

माणूस मारला गं, माणूस मारला

Published On: Sep 14 2017 2:19AM | Last Updated: Sep 13 2017 8:55PM

बुकमार्क करा





गौरी लंकेश पत्रकारिता क्षेत्रातील नावाजलेले नाव. सतत रुढी, परंपराच्या विरोधात लढणार्‍या एक लढवय्या सामाजिक कार्यकर्त्या.सतत आपल्या लिखाणातून हिंदू मूलतत्ववाद्यांचा धोका आपल्या लेखणीतून प्रकट करणार्‍या एक संवेदनशील पत्रकार होत्या. लंकेश आपल्या साप्ताहिकमध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात घेत नव्हत्या. या साप्ताहिकाचा उद्देश समाजातील पीडित, शोषित घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता.

गौरी लंकेश या कन्नड भाषेतून प्रदर्शित होणार्‍या साप्ताहिक लंकेश पत्रिकेच्या संपादक होत्या. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात The Times Of India या वर्तमानपत्रातून केली. Sunday Magazine मध्ये त्यांनी नऊ वर्षे काम केले. 2012 मध्ये जातीवाद्यांच्या विरोधात प्रदर्शनात त्या म्हणाल्या की Hinduism was not religion but a system of heirachy in society in which are treated as second class creatures.

नोव्हेंबर 2014 काँग्रेसप्रणित कर्नाटक सरकारने नक्षलवाद्यांनी हिंसा सोडून आत्मसमर्पण करावे, यासाठी त्यांना कमिटी मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यावेळेस भाजपच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे त्या नक्षलवादी समर्थक असून त्यांना कमिटीवरून काढण्यात यावे, अशी मागणी केली.

अलीकडच्या काळात गौरी लंकेश यांनी राणा अयुब यांच्या the gujrat files या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर केले होते. राणा अयुब यांनी बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की , गौरी लंकेश यांना श्रीराम सेनेसारख्या दक्षिणपंथी संघटनांकडून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. दक्षिणपंथी संघटनांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या त्या एकमेव महिला होत्या. याच कारणांमुळे त्यांची हत्या झाली असेल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

गौरी नेहमी म्हणायच्या की, मी एका धर्मनिरपेक्ष देशाची नागरिक आहे आणि मी कोणत्या प्रकारच्या धार्मिक कट्टरता वादाच्या विरोधात आहे. लेखक मंगेश डबराल म्हणाले की, गौरी लंकेश यांची हत्या विचारधारेमुळेच झाली आहे. गौरी लंकेश नेहमी एक चिंता प्रकट करत की, कॉ. पानसरे,  डॉ. दाभोलकर ,  प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येत सनातन प्रभातचे नाव वारंवार समोर येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आजचे सत्ताधारी लोक अशा संघटनांवर वरदहस्त ठेवून आहेत. आपल्या शेवटच्या संपादकीय लेखात त्यांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणार्‍या मोदी भक्तांची पोलखोल केली आहे. त्यात त्या लिहितात की, राम रहीम बाबाला शिक्षा झाल्यानंतर भाजपा नेत्यांचे फोटो व्हायरल होते होते. त्यावेळेस भक्तांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा फोटो फोटोशॉप करून व्हायरल केला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ट्विटर अकाऊंटला 30 लाख फॉलोअर्स होते. तेच अकाऊंट जेव्हा नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने बदलले, तेव्हा अशी अफवा पसरवण्यात आली की, एका तासात 30 लाख लोकांनी नव्या राष्ट्रपतींना फॉलो केलं. मुळात ते फॉलोअर्स पूर्वीपासून तेवढेच होते.सरळ स्पष्ट भाषेत त्यांनी असं लिहले की, फेक न्यूज फक्त भक्त नव्हे, तर इतरही पसरवतात. त्यांनी फेक न्यूज चालवणार्‍या लोकांना जे कोणी जनतेसमोर आणत आहेत, त्यांचे आभार मानले व लिहिले की, त्यांना मी सलाम करते. माझी इच्छा आहे की, जनतेसमोर सत्य मांडणार्‍या लोकांची संख्या वाढावी.

दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातन प्रभात आनंद व्यक्त करते नि महाराष्ट्राची विधानसभा पानसरेंच्या हत्येनंतर शोकप्रस्तावही सादर करू शकत नाही. कलबुर्गींच्या हत्येनंतर बजरंग दलाचा सहसमन्वयक म्हणतो- आमच्यावर टीका कराल तर कुत्र्याचं मरण येईल! यू. आर. अनंतमूर्ती यांच्या नैसर्गिक मृत्यूनंतर भाजपचे कार्यकर्ते फटाके उडवतात. गांधी हत्येनंतर कुणी मिठाई वाटली होती, हे आपण जाणतोच. 

माणूस गेल्यानंतर या पध्दतीने व्यक्त व्हावे वाटणारी ही ‘माणसं’ नक्की कोण आहेत ? ही नेमकी कोणती विकृती आहे ?

गौरी लंकेश या freedom of the press म्हणून ओळखल्या जात. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे, प्रा. कुलबुर्गी यांच्या हत्येनंतर गौरी लंकेश यांची हत्या होणे हे पुरोगामी चळवळीचे अपयश आहे, असे म्हणायला हवे. सरकार,  पोलिस यंत्रणा मारेकर्‍यांना शोधण्यात अपयशी ठरत आहेत. आता गरज आहे सर्व मतभेद विसरून एका वैचारिक पातळीवर येऊन लढाई लढण्याची.

संपविला देह जरी संपणार नाही मती, धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती..