प्रियाला एकाच दिवसात मिळाले ६१० हजार फॉलोअर्स! | पुढारी 
Tue, Aug 21, 2018 03:31होमपेज › Vishwasanchar › प्रियाला एकाच दिवसात मिळाले ६१० हजार फॉलोअर्स!

प्रियाला एकाच दिवसात मिळाले ६१० हजार फॉलोअर्स!

Published On: Feb 13 2018 10:32PM | Last Updated: Feb 13 2018 10:00PMतिरुवनंतपुरम :

 ‘ती’ आली, तिने पाहिले आणि तिने जिंकले असेच आता प्रिया प्रकाश वरियार या अठरा वर्षांच्या अभिनेत्रीबाबत म्हणावे लागेल. तिच्या पदार्पणाच्याच मल्याळी भाषेतील चित्रपटातील अवघ्या काही सेकंदांच्या एका दृश्यामुळे ही अभिनेत्री आता केरळमध्येच नव्हे तर देश-विदेशात अमाप लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियात तिच्या गाण्याची छोटीशी क्लिप व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. अवघ्या एकाच दिवसात तिला इन्स्टाग्रामवर 610 हजार फॉलोअर्स मिळाले आहेत.

‘उरू अदार लव’ हा मल्याळम चित्रपट सध्या आपल्या कलाकार जोडीमुळे सोशल मीडियावर गाजतो आहे. प्रिया वरियार आणि रोशन अब्दुल रहूफ असे नाव असलेल्या या जोडीचे अनेक चाहते बनले. आपल्या नजरेने घायाळ करणारी ही अभिनेत्री अनेक चाहत्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या होम स्क्रिनवर पाहायला मिळत आहे. अवघ्या एकाच दिवसात ज्यांना इतके फॉलोअर्स मिळाले अशा सेलिब्रिटींच्या यादीत आता तिला तिसरे स्थान मिळाले आहे. यापूर्वी कायली जेनिफर या अभिनेत्रीला एका दिवसांत (5 फेब्रुवारी 2018) 860 हजार चाहत्यांनी फॉलो केलं तर क्रिस्टियानो रोनॅल्डो या फुटबॉलरला 13 नोव्हेंबर 2017 रोजी 650 हजार चाहत्यांनी फॉलो केलं. ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटात तिला एका छोट्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं. पण, कालांतराने अभिनय कौशल्य पाहून मुख्य भूमिकेसाठी तिची वर्णी लागली आणि त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहेतच! सोशल मीडियात आपल्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल याची मूळीच अपेक्षा केली नव्हती, असे तिने म्हटले आहे. याबाबत तिने आपल्या दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत.