Fri, Nov 16, 2018 19:41होमपेज › Vishwasanchar › मंगळावर माणूस पाठवण्यात ‘या’ अडचणी!

मंगळावर माणूस पाठवण्यात ‘या’ अडचणी!

Published On: Sep 13 2018 1:52AM | Last Updated: Sep 12 2018 11:01PMवॉशिंग्टन : 

‘नासा’ने मंगळावर माणूस पाठवण्याच्या मार्गात येणार्‍या पाच अडचणींची एक यादी बनवली आहे. या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची मदत घेण्यात आली. ‘नासा’च्या मते, मंगळावर माणूस पाठवण्याच्या मार्गात विकिरण, अंतर, वेगळेपणा, गुरुत्वाकर्षण आणि वातावरणाचा अभाव या मुख्य अडचणी आहेत.

दीर्घकाळ अंतराळ प्रवास करीत असताना मानवी शरीर आणि मन कसे काम करेल, याचाही ‘नासा’ने अभ्यास केला आहे. अर्थातच असा प्रवास ही सहजसोपी बाब नाही. अंतराळ प्रवासात विकिरणांची समस्या गंभीर असते. ही किरणे मानवी डोळ्यांनी दिसत नसली तरी त्यांचा परिणाम मोठा असतो. अंतराळवीराला प्रवासासाठीचे प्रशिक्षण कितीही चांगल्याप्रकारे दिलेले असले तरी काही काळानंतर अंतराळात राहिल्यावर त्याच्या व्यवहारात समस्या येऊ लागतात. त्यामुळे मंगळ प्रवासासारख्या दीर्घ प्रवासासाठी अंतराळवीर निवडत असताना बरीच सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अनेक वर्षे अंतराळात राहण्याची त्यामध्ये क्षमता असणे गरजेचे आहे. पृथ्वीपासून मंगळाचे अंतर 14 कोटी मैलाचे आहे. चंद्रावर पोहोचण्यासाठी माणसाला जास्तीत जास्त तीन दिवसांचा प्रवास करावा लागतो. मात्र, मंगळावर जाण्यासाठी सुमारे तीन वर्षे लागू शकतात. तिथे वेगळ्याच प्रकारच्या गुरुत्वाकर्षणाचाही सामना करावा लागू शकतो. तेथील तापमान, दाब आणि ध्वनीही मोठेच आव्हान ठरू शकते.