Tue, Jul 23, 2019 13:13होमपेज › Vishwasanchar › मत्सरग्रस्त महिलेची प्रियांकावर आक्षेपार्ह टीका

मत्सरग्रस्त महिलेची प्रियांकावर आक्षेपार्ह टीका

Published On: Dec 07 2018 1:50AM | Last Updated: Dec 07 2018 1:50AM
न्यूयॉर्कः 

प्रियांका चोप्रा ही किती मोठी सेलिब्रिटी आहे हे नव्याने सांगण्याचे कारण नाही. मात्र, परदेशातील काही मत्सरग्रस्त जीवांना तिची प्रगती खुपत आहे हे खरेच. ‘मिस वर्ल्ड’ चा किताब जिंकल्यानंतर प्रियांकाने मॉडेलिंगच्या क्षेत्रात आणि नंतर अभिनयाच्या क्षेत्रात नावलौकीक मिळवला. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘बर्फी’मधील प्रियांका कोण विसरू शकते? तिच प्रियांका ‘बाजीराव-मस्तानी’ मध्ये काशीबाईंच्या संयत भूमिकेतही भाव खाऊन गेली. तिने एकाच चित्रपटात सात भूमिकाही केल्या होत्या. गायनातही आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या प्रियांका चोप्राने ‘क्‍वाँटिको’मधून पाश्‍चात्यांच्या घराघरांत प्रवेश केला. अशा प्रियांकाने निव्वळ करिअर व हॉलीवूडमधील बस्तान बसवण्यासाठी निक जोनास या पॉप स्टारशी लग्‍न केले, असे कोण म्हणू शकेल? मात्र एक मत्सरग्रस्त महिला तिकडेही आहे व तिने ‘द कट’ या मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत प्रियांकावर असा लेख लिहिला. या लेखाबाबत जगभरातून टीकेची झोड उठल्यावर अखेर मासिकाला हा लेख मागे घ्यावा लागला.

‘इज प्रियांका चोप्रा अँड निक जोनास लव्ह फॉर रियल?’या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या लेखात लेखिका मारिहा स्मिथने आक्षेपार्ह भाषा वापरत निक आणि प्रियांकाच्या लग्‍नावर टीका केली आहे. प्रियांका ही ग्लोबल स्टार नसून ती ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ आहे. तिने केवळ स्वत:च्या फायद्यासाठी आणि हॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी निक जोनासशी लग्‍न केले. निक, ज्यो, सोफी टर्नर हे ग्लोबल स्टार आहेत, यांच्याशी नातं जोडून तिला स्वत:चा फायदा करून घ्यायचा होता म्हणूनच तिने स्वत:पेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या निकला आपल्या जाळ्यात अडकवले अशा प्रकारची टीका स्मिथ यांनी आपल्या लेखातून केली. निकला प्रियांकाशी लग्‍न करण्यात रस नव्हता; मात्र प्रियांकाने त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला स्वत:शी लग्‍न करण्यास भाग पाडले. हे लग्‍न म्हणजे केवळ या जोडप्यासाठी पैसे कमावण्याचा इव्हेंट होता. हा लग्‍नसोहळा म्हणजे या जोडप्यासाठी अतिरिक्‍त कमाई करण्याचे साधन होते. लग्‍नाचे फोटो विकून त्यांनी ते सिद्धही केले. प्रियांका जे काही बोलते तो केवळ दिखावा असून तिच्या करिअरसाठी ती सारे करत असते, असेही या लेखात म्हटले होते. या व्यतिरिक्‍तही अनेक आक्षेपार्ह टीका या लेखातून करण्यात आल्या होत्या. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ‘द कट’ मासिकावर टीका करण्यात आली. अभिनेत्री सोनम कपूर-आहुजा, सोफी टर्नर, स्वरा भास्कर यासारख्या अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या लेखावर नाराजी व्यक्‍त केली आहे. हा लेख आकसाने आणि वर्णद्वेषातून लिहिला असल्याचा सर्वांचा सूर होता. त्यामुळे मासिकाने अखेर माफी मागून हा लेख मागे घेतला.