‘नोबेल’ विजेता म्हणतो लवकरच दूर होईल कोरोनाचे संकट

Last Updated: Mar 26 2020 9:03PM
Responsive image


न्यूयॉर्क :

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे सध्या अवघे जगच भीतीच्या छायेत आहे. या व्हायरसचा धोका इतका मोठा आहे, की जगभरातील सुमारे एक तृतियांश लोकसंख्या आपल्या घरातच बंद आहे. या भयाच्या वातावरणात नोबेल पुरस्कार विजेते जैवभौतिकशास्त्रज्ञ मायकल लेव्हिट यांनी म्हटले आहे, की जगावरील हे कोरोना व्हायरसचे संकट लवकरच हटेल.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील बायोफिजिसिस्ट लेव्हिट यांना 2003 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी म्हटले आहे, की जगभरातील लोक सध्या सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करीत आहेत. एकमेकांपासून अंतर ठेवल्यामुळे एक बुस्टर शॉट दिल्यासारखेच झाले आहे आणि तो या महामारीपासून बचाव करण्यासाठी आवश्यकच होता. त्यामुळे लवकरच हे कोरोनाचे संकट दूर होऊ शकते. त्यांनी ‘द लॉस एंजिल्स टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे, की या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी जे करावे लागते, ते सध्या आपण करीत असल्याने सर्व काही ठीक होत आहे. घरातच थांबणे किंवा वारंवार हात धुणे वगैरे गोष्टींमुळे आता परिस्थिती अनुमानाइतकी भयानक राहिलेली नाही. लोकांनी संयम पाळला, तर लवकरच जगावरून हे अरिष्ट दूर होईल. विशेष म्हणजे, सर्वात प्रथम लेव्हिट यांनीच चीनमध्ये या महामारीने विनाशकारी प्रकोप येईल, असे म्हटले होते. चीनमध्ये सव्वातीन हजार लोक मृत्युमुखी पडतील, असेही त्यांनी म्हटले होते, जे खरे ठरले आहे.