मंगळाच्या गेल क्रेटरमधून बाहेर पडतोय मिथेन वायू

Published On: Aug 26 2019 1:52AM | Last Updated: Aug 25 2019 8:26PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


मेलबोर्न :

मंगळ ग्रहावीरल मिथेनचे रहस्यमयी स्रोत शोधण्याच्या दिशेने खगोलशास्त्रांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या मते, मंगळ ग्रहावरील एका मोठ्या क्रेटरमधून सध्या मिथेन वायू बाहेर पडत आहे. हा वायू असणे म्हणजे मंगळावरील जीवनाचे हे एक संकेतच आहेत. अथवा बिगर जैविक हालचालही असू शकते. 

संशोधकांच्या मते ज्या मोठ्या क्रेटरमधून मिथेन बाहेर पडत आहे, ते 3.8 अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. त्याचे नाव ‘गेल क्रेटर’ असे असून त्याचा व्यास सुमारे 154 कि.मी. इतका मोठा आहे. तर काही शास्त्रज्ञांच्या मते, गेल क्रेटर म्हणजे एक प्राचिन सरोवर असणार. 

‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार सॅटेलाईट एक्सोमार्स ट्रेस गॅस आणि मंगळावरील माती आणि हवेचे नमुने गोळा करणार्‍या नासाच्या ‘क्युरिओसिटी रोव्हर’ च्या माध्यमातून मिळालेल्या डाटाचे विश्‍लेषण केले आहे. यामुळे मंगळावरील मिथेन वायूबाबत अधिक माहिती मिळणे शक्य झाले. 

कॅनडातील यार्क युनिव्हर्सिटीतील एएनयूचे संशोधक जॉन मुरेस यांनी सांगितले की, गेल्या दशकभरापासून शास्त्रज्ञ हे मंगळावरील मिथेनचे स्रोत काय असेल? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नव्या संशोधनानुसार मंगळाच्या वातावरणातील मिथेन हे तेथील घनतेनुसार बदलत असते. तर प्रो. पेन्‍नी यांनी सांगितले की, पृथ्वीवर असे असंख्य सूक्ष्मजीव आहेत की ते ऑक्सिजनशिवाय राहू शकता. ते खोल जमिनीत राहतात आणि मिथेन वायू सोडत असतात. असाच प्रकार मंगळावरही होत असेल.