वधू-वरांसाठी ‘मॅचिंग’ मास्क!

Last Updated: May 22 2020 9:57PM
Responsive image


जयपूर : देश-विदेशात आता मास्क ही दैनंदिन गरजेची बाब बनली आहे आणि तिचा आपुसकच फॅशन इंडस्ट्रीतही प्रवेश झाला आहे. काही दिवसांपूर्वी चीनमधील फॅशन शोमध्येही असे फॅशनेबल मास्क दिसून आले होते. भारतातही असे वेगवेगळ्या प्रकारचे ‘स्टायलिश मास्क’ बनवले जात आहेत. विशेषतः लग्‍नसमारंभांमध्ये वधू-वरांच्या पोषाखांशी मिळते-जुळते, भरजरी, मोती व अन्य खडे जडवलेले मास्क तयार केले जात आहेत!

जयपूरमधील डिझायनरनी मास्क आणि सॅनिटायझरलाही आता फॅशनमध्ये समाविष्ट केले आहे. ज्या फॅबि—कचा म्हणजेच कापडाचा पोषाख असेल त्याच कापडाचा मास्कही असेल. सॅनिटायझरची बाटलीही स्टायलिश पोटलीतून दिली जाईल! मुली ही बाटली आपल्या हँड काऊचसारखी घेऊन फिरू शकतील. मास्कमध्ये तर बरीच विविधता आहे. ज्वेलरी बेस्ड मास्क जयपूरमध्ये लोकप्रिय होत आहेत. डिझायनर नेहा कट्टा यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की फूल बॉडी कव्हर्ड गाऊन्स, गर्ल्स अ‍ॅक्सेसरीज, स्कार्फ कॉम्बो, मॅचिंग किटही तयार केले जात आहेत. ‘सुरक्षा आणि सौंदर्य’ दोन्हीचा एकाच वेळी विचार होत आहे. फॅन्सी मास्कची किंमत दीडशे रुपयांपासून आहे. वेडिंग मास्कची किंमत पाचशे रुपयांपासून आहे. त्यामध्ये बरीच मोठी व्हरायटी आहे. मुलांसाठी खास कार्टुन असलेले मास्क बनवले आहेत.