Thu, Aug 22, 2019 14:53होमपेज › Vishwasanchar › माधुरी झाली  ५१ वर्षांची!

माधुरी झाली  ५१ वर्षांची!

Published On: May 16 2019 1:58AM | Last Updated: May 16 2019 1:58AM
मुंबईः खरं वाटतं का? ‘धक धक गर्ल’ने आता वयाची पन्नाशी पार केलेली आहे. अजूनही माधुरी दीक्षितचे सौंदर्य अबाधित असल्याने वयाच्या हिशेबात तिने आयुष्याचे अर्धशतक पार केले यावर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. मात्र, काळ नावाची गोष्ट कुणासाठीही थांबत नाही आणि बुधवारी माधुरीने आपला 51 वा वाढदिवस साजरा केला! अलीकडच्या ‘कलंक’ किंवा ‘टोटल धमाल’सारख्या हिंदी चित्रपटांमधून तसेच ‘बकेटलिस्ट’सारख्या मराठी चित्रपटातूनही माधुरीने आपली ‘मोहिनी’ कायम असल्याचे सिद्ध केले होते! 

15 मे 1967 हा माधुरीचा जन्मदिवस. एका मर्‍हाटमोळ्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या माधुरीने 1984 मध्ये ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 1988 मध्ये ‘तेजाब’ आला आणि त्याच्या यशानंतर माधुरीला कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. त्यामधील ‘एक, दोन, तीन...’ गाणे आजही रसिकांचे फेव्हरेट आहे. राम-लखन, त्रिदेव, किशन-कन्हैया, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके है कौन, राजा, दिल तो पागल है असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले. प्रेमप्रतिज्ञा, परिंदा, प्रहार, अंजाम, मृत्यूदंडसारखे काही वेगळे चित्रपटही तिने केले. ‘पुकार’मध्ये तिने निगेटिव्ह शेड असलेली भूमिका केली होती. ‘देवदास’मधील तिची भूमिकाही लोकांना भावली. आजही माधुरी तितक्याच उत्साहात आणि पूर्वीच्या दिमाखातच काम करीत आहे. सहा फिल्मफेअर पटकावलेली माधुरी आज एक जिवंत दंतकथा बनून राहिली आहे!