इराकी महिलेच्या लाळग्रंथीतून काढले 53 खडे!

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


नवी दिल्‍ली : ‘किडनी स्टोन’ म्हणजेच ‘मूत्रपिंडातील खडे’ किंवा ‘मूतखडे’ सर्वांनाच माहिती असतात. मात्र, पित्ताशय किंवा लाळग्रंथीतही खडे होतात याची अनेकांना माहिती नसेल. घशामध्ये जबड्याभोवती लाळग्रंथी असतात. इराकमधील 66 वर्षांच्या एका महिलेला काही खाल्ल्यानंतर गालांमध्ये सूज येत असे. तपासणी केल्यावर तिच्या पॅरोटिड ग्लँड या लाळग्रंथीत खडे असल्याचे निष्पन्‍न झाले. या खड्यांमुळेच तिच्या गालांवर सूज येत असे. या महिलेच्या लाळग्रंथीतील तब्बल 53 खडे दिल्‍लीच्या गंगाराम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढले!

चेहर्‍यावर कोणताही व—ण न ठेवता हे खडे काढणे शक्य नसल्याचे इराकमधील डॉक्टरांनी या महिलेस सांगितले होते. त्यामुळे ही महिला तिथे सर्जरी करून घेण्यास तयार नव्हती. त्यासाठी ती भारतात आली आणि तिने दिल्‍लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करवून घेतली. पॅरोटिड ग्लँडमध्ये इतक्या मोठ्या संख्येने खडे आढळणे आणि ते बाहेर काढण्याची ही जगातील पहिलीच वेळ असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तेथील डॉ. वरुण राय यांनी सांगितले की, अवघ्या 3 मि.मी. रुंदीच्या नलिकेवर कोणतीही जखम न करता सर्व खडे हटवणे हे आव्हानात्मकच होते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी दोन तास लागले. पॅरोटिड ग्लँडमधून 25 पेक्षा अधिक खडे बाहेर काढण्याची नोंद आतापर्यंत कुठेही झालेली नाही. लाळग्रंथींमधील खड्यांचे उदाहरण जगात 0.02 टक्क्यापेक्षाही कमी असते. त्यामध्येही 53 खडे निघणे हे तर अत्यंत दुर्मीळ आहे. ही महिला काहीही खात असताना लाळग्रंथीतून या खड्यांमुळे लाळ स्रवत नसे. त्यामुळे चेहर्‍यावर सूज येत असे.