एलियन ‘जादू’ परत येणार?

Last Updated: May 23 2020 1:46AM
Responsive image
संग्रहीक छायाचित्र


मुंबई : हृतिक रोशनच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘क्रिश’ सीरिजचे चित्रपट सर्वात पुढे आहेत. आतापर्यंत या सीरिजमधील तीन चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. त्यामध्ये प्रेक्षकांनी हृतिकच्या सुपर हीरोला पसंतीची दाद दिली होती. आता त्याचे चाहते चौथ्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. कदाचित या नव्या चित्रपटात ‘जादू’ ही परग्रहवासी व्यक्‍तिरेखा पुन्हा दिसू शकते.

सध्या राकेश रोशन आणि हृतिक या नव्या चित्रपटाची जुळवाजुळव करीत आहेत. त्यांच्या लेखकांची टीम सध्या या चित्रपटासाठी नव्या कल्पनेचा शोध घेत होती आणि आता त्यांना ही कल्पना सुचली आहे. त्यांना वाटते की ‘क्रिश 3’मध्ये रोहित मेहराचा मृत्यू दाखवल्यानंतर आता एलियन ‘जादू’ला परत आणण्याची हीच योग्य वेळ आहे. याच एलियनमुळे हृतिकला चित्रपटात विशेष शक्‍ती मिळाल्याचे दाखवले आहे. लोकही या एलियनला विसरलेले नाहीत. अलीकडेच बंगळूर शहर गूढ आवाजाने हादरल्यावर सोशल मीडियात अनेकांनी ‘हृतिकने एलियनना पुन्हा बोलावले की काय?’ असे गंमतीने विचारले होते. हृतिकनेही ‘एलियन्सना बोलावण्याची योग्य वेळ आली आहे’ असे सूचक उत्तर दिले होते. त्यावरूनही आता त्याच्या नव्या चित्रपटात ‘जादू’चे पुनरागमन होऊ शकते असे म्हटले जात आहे.