एकाच दिवशी जन्मलेल्या चार बहिणींचा विवाह एकाच दिवशी

Last Updated: Nov 08 2019 7:57PM
Responsive image


तिरुवनंतरपूरम : केरळमध्ये 18 नोव्हेंबर 1995 या दिवशी चार मुली आणि एक मुलगा अशा पाच भावंडांचा जन्म झाला होता. या चौघी बहिणींची नावे उथराजा, उथारा, उथम्मा आणि उथरा असे असून भावाचे नाव उथराजन असे आहे. या चौघी बहिणींचे एकाच दिवशी म्हणजे 26 एप्रिल 2022 मध्ये लग्‍न होणार आहे. गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात हा विवाह सोहळा होईल.

या पाचजणांचा जन्म झाल्यावर त्यांच्या पित्याने घराचे नाव ‘पंचरत्नम’ असे ठेवले होते. वडिलांनी नऊ वर्षे पाचही भावंडांना सर्व वस्तू एकसारख्याच दिल्या. त्यामध्ये स्कूल बॅगेपासून छत्री आणि पोषाखांपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश आहे. मुलं नऊ वर्षांची झाल्यावर म्हणजे 2004 मध्ये त्यांच्या आईला हृदयाशी संबंधित एक आजार जडला. त्यामुळे व आर्थिक अडचणींमुळे हताश होऊन या भावंडांच्या वडिलांनी आत्महत्या केली.

वडिलांच्या माघारी अर्थातच या भावंडांची फरफट झाली; पण आईने आजारी असूनही धीर सोडला नाही व मुलांचा खंबीरपणे सांभाळ करण्याचे ठरवले. काही आप्‍तस्वकीयांच्या मदतीने तिला तिरुवनंतपूरममध्ये एका सहकारी बँकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याची नोकरी मिळाली. त्यानंतर कुटुंबाची आर्थिक सुधारणा होऊ लागली. याच महिन्यात ही सगळी भावंडे 24 वर्षांची झाली आहेत. चार मुलींपैकी एक फॅशन डिझायनर, दोघी अ‍ॅनेस्थेशिया टेक्निशियन आणि एक ऑनलाईन लेखिका आहे. चौघींचा भाऊ आता सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. बहिणींची लग्‍ने करून आणि स्वतः नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावरच तो लग्‍न करणार आहे.