कमोडमध्ये अजगराचा ठिय्या!

Last Updated: Oct 09 2019 10:12PM
Responsive image


सिडनी ः

ऑस्ट्रेलियात अजगराचे सापही घरात आलेली अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यातही कमोडमध्ये साप असल्याचेही प्रकार समोर आले होते. आताही ऑस्ट्रेलियाच्या केयर्न्स येथे एक महिला आपल्या टॉयलेटमध्ये गेली असता कमोडमध्ये चक्‍क एका अजगराने ठाण मांडल्याचे तिला दिसून आले आणि तिची पाचावर धारण बसली!

तिने सांगितले, मी नुकतीच नोकरीच्या ठिकाणी जाऊन आले होते आणि बाथरूममध्ये मला टॉयलेटचा पॉट उघडा दिसला. तिथे काही तरी काळसर दिसून आले व अधिक बारकाईने पाहिल्यावर सापाचे तोंड वरच्या दिशेेन येत असल्याचे मी पाहिले. हे द‍ृश्य पाहिल्यावर अर्थातच मी घाबरले आणि तत्काळ ‘केयर्न्स स्नेक रिमुव्हल्स’ला फोन केला. त्यानंतर हे सर्पमित्र आले व त्यांनी हा अजगर पकडून नेला.

त्यांनीच कमोडमधील अजगराचा हा फोटो टिपून घेतला होता. निकोल एर्रे नावाच्या या महिलेच्या बाथरूममधील अजगराचा हा फोटो फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. हा अजगर नंतर कमोडमधून बाहेर येऊन वॉश बेसिनवरही चढून बसला. विशेष म्हणजे दुसर्‍या दिवशी दुसरा एक साप याच महिलेच्या दुसर्‍या बाथरूममध्ये आढळला! त्यानंतर केयर्न्स स्नेक रिमुव्हल्सनी त्याचाही फोटो फेसबुकवर शेअर करून ‘आज आम्हला त्याच पत्त्यावर आणखी एक साप मिळाला, दोन दिवसात दोन साप!’ असे लिहिले!