Mon, Jul 13, 2020 10:17होमपेज › Vishwasanchar › ‘हा’ नंदी दरवर्षी एक इंचाने वाढतो?

‘हा’ नंदी दरवर्षी एक इंचाने वाढतो?

Published On: Dec 06 2018 1:38AM | Last Updated: Dec 05 2018 9:56PMअनंतपूर :

आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच गुजरातपासून ओडिशापर्यंत सर्वत्र शिवमंदिरे आढळतात. अर्थातच जिथे शिवलिंग आहे तिथे समोर नंदीही असतोच. प्रत्येक मंदिराचे वेगळे वैशिष्ट्यही असते. आंध्रप्रदेशात कुरनूल जिल्ह्यातील यागंटी येथील उमामहेश्‍वर मंदिरही असेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथील नंदीची मूर्ती दरवर्षी एक इंचाने वाढते, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या काही तज्ज्ञांनीही याबाबतचे निरीक्षण करून पुष्टी दिली आहे. ज्या शिळेपासून ही नंदीची मूर्ती घडवली आहे त्यामध्ये नैसर्गिकरीत्याच वाढीचे काही गुण असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुरातत्त्व खात्याने सतत पंधरा वर्षे या नंदीच्या मूर्तीची पाहणी केली व दरवर्षी त्याच्या आकारात होणार्‍या बदलाची नोंद केली. दरवर्षी ही मूर्ती एक इंचाने वाढत असल्याचे त्यांना दिसून आले. मूर्ती वाढत असल्याने जवळचा एक खांबही काढून टाकण्यात आला होता. आताही ही मूर्ती एका खांबाला अगदी खेटून आलेली आहे. एल्लूर येथील खाण आणि भूगर्भविज्ञान विभागाचे सहायक संचालक सी. मोहन राव यांनी सांगितले की, दगडांच्या आकारातही काही रासायनिक क्रियांमुळे वृद्धी होत असते. नंदीमूर्तीच्या शिळेत वालुका आणि लोहाचे घटक आहेत. एखाद्या खनिजाचे सिलिकाच्या रूपामध्ये रूपांतरण होते त्यावेळी त्याचा आकार वाढतो. सध्या या नंदीमूर्तीची उंची 5 फूट असून रूंदी 15 फूट आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधण्यात आले आहे. याठिकाणी काही दंतकथाही प्रचलित आहेत. हा नंदी कलियुगाच्या शेवटी सजीव होईल व कलियुग संपुष्टात येईल, असे म्हटले जाते. तसेच महर्षी अगस्तींच्या शापामुळे याठिकाणी कावळे येत नाहीत, असेही म्हटले जाते.