कोरोनावरील उपचारात अश्‍वगंधा ठरू शकते गुणकारी

Last Updated: May 23 2020 1:46AM
Responsive image
संग्रहीक छायाचित्र


नवी दिल्‍ली : प्राचीन भारतीय संस्कृतीची एक महान देणगी असलेल्या आयुर्वेदामध्ये अनेक गंभीर आजारांवरही उपचार आहेत. आता कोरोनासारख्या भयानक महामारीच्या काळातही आयुर्वेदाकडे देश-विदेशातील तज्ज्ञ आशेने पाहत आहेत. आयआयटी दिल्‍ली आणि जपानमधील संशोधकांनी कोरोनावरील उपचारात अश्‍वगंधा गुणकारी ठरू शकते असे म्हटले आहे.

आयआयटी दिल्‍ली आणि जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. अश्‍वगंधा आणि प्रोपोलिसमध्ये असे घटक आहेत ज्यांच्या सहाय्याने कोरोनावर उपचार शक्य होईल असे त्यांनी म्हटले आहे. ‘प्रोपोलिस’ म्हणजे मधमाश्यांनी झाडांमधून गोळा केलेला डिंकासारखा चिकट पदार्थ. त्याचा वापर मधमाश्या पोळ्याची डागडुजी वगैरे करण्यासाठी करतात. अश्‍वगंधामधील विथानोन संयुग आणि प्रोपोलिसमधील कॅफिक अ‍ॅसिड ‘फिनेथाईल ईस्टर’मध्ये ‘सार्स-सीओव्ही-2’ मधील ‘एमपीआरओ’ एंझाईमच्या हालचाली रोखण्याची क्षमता आहे. अश्‍वगंधा आणि प्रोपोलिसचा वापर केवळ उपचारासाठी नव्हे तर संक्रमण रोखण्यासाठीही होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे. अलीकडेच भारत सरकारने आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, युनिव्हर्सिटी ग्रांटस् कमिशन आणि आयसीएमआरच्या मदतीने अश्‍वगंधावरील क्‍लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. जर या चाचण्या मानवावरही यशस्वी ठरल्या तर सध्याच्या महामारीच्या काळात हे मानवजातीला मोठेच वरदान ठरू शकेल.