लग्‍नात वधूने ‘यासाठी’ वडिलांच्या अस्थींचे तुकडे सजवले नखांवर

Last Updated: Oct 09 2019 10:10PM
Responsive image


लंडन ः

मुलीच्या लग्‍नात तिची सासरी पाठवणी करण्यासाठी वडील हवेच असतात. ते नसतील तर मुलीला साहजिकच वडिलांची आठवण येत असते. बि—टनमध्ये एका तरुणीबाबत असेच घडले. तिचे लग्‍न ठरल्यानंतर तिच्या वडिलांचा कर्करोग फैलावला असल्याचे समजले. त्यामुळे लग्‍न थोडे पुढे ढकलण्यात आले. मात्र, लग्‍नाच्या तारखेच्या काही दिवस आधी तिच्या वडिलांचे निधन झाले. लग्‍नावेळी आपले वडील सोबत आहेत अशा भावनेने तिने त्यांच्या अस्थींचे तुकडे चमकदार खड्यांसह नखांवर सजवले!

लग्‍नाच्या दिवशी तिने आपल्या अ‍ॅक्रिलिक नखांवर पित्याच्या नखांचे हे तुकडे सजवले होते. शार्लोट वॉटसन असे तिचे नाव. तिचा पती निक याने भावी सासर्‍यांचा आजार बळावल्याचे कळताच आपल्या लग्‍नाची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, लग्‍नाच्या तारखेच्या काही दिवस आधीच शार्लोटचे वडील मिक बार्बर यांचे निधन झाले. शार्लोटने आपल्या लग्‍नाच्या श्रृंगारात वडिलांच्या अस्थींचाही वापर करून त्यांना आपल्या लग्‍नात अशा पद्धतीने सहभागी करून घेण्याचे ठरवले होते.

तिने नखांवर गुलाबी, करड्या आणि सफेद रंगाच्या डिझाईनबरोबर रंगीत खड्यांसह अस्थींचे हे तुकडे सजावटीसाठी वापरले होते. यामुळे वडील खरोखरच माझ्यासोबत आहेत असे मला वाटत राहिले, असे नंतर तिने सांगितले.