टोमॅटोमुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेत 50 टक्के वाढ

Last Updated: Oct 09 2019 10:08PM
Responsive image


लंडन ः

एके काळी विषारी फळ समजल्या गेलेल्या टोमॅटोचे आरोग्यासाठी अनेक लाभ असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. आता संशोधकांनी म्हटले आहे की, टोमॅटोच्या नियमित सेवनाचा पुरुषांना चांगलाच लाभ होतो व शुक्राणूंच्या गुणवत्तेत 50 टक्क्यांनी वाढ होते. अगदी दिवसातून दोन चमचे टॉमॅटोची प्युरी खाणार्‍यांमध्येही शुक्राणू गुणवत्ता सुधारते.

टोमॅटोमध्ये लाईकोपिन नावाचा घटक असतो. याच रसायनामुळे टोमॅटोचा रंग लाल असतो. लायकोपिनमुळे रक्‍तदाब कमी होतो आणि पुरुषांमध्ये प्रोटेस्ट कॅन्सरचा धोकाही घटतो. संशोधकांनी याबाबतच्या संशोधनासाठी काही पुरुषांना तीन महिने दिवसातून दोनवेळा लायकोपिनपासून बनवलेली गोळी दिली. तीन महिन्यांनंतर असे दिसून आले की, या पुरुषांमध्ये वेगाने शुक्राणू बनत आहेत.

पुरुषांना लायकोपिनचे जे प्रमाण देण्यात आले होते ते एका दिवसात शिजवलेल्या टोमॅटोच्या पाच डब्यांइतके होते. टोमॅटोमुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेतच नव्हे तर आकारातही सुधारणा होते. याबाबत शेफिल्ड विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. याबाबतच्या पाहणीत 19 ते 30 वर्षे वयोगटातील 56 पुरुषांनी सहभाग घेतला. संशोधनाचा निष्कर्ष थक्‍क करणारा होता, असे संशोधनाशी निगडीत प्रा.एलन पेसी यांनी सांगितले.