Thu, Sep 19, 2019 03:26होमपेज › Vidarbha › विदर्भात युतीचा आठ जागी विजय, दोन जागी धक्‍का

विदर्भात युतीचा आठ जागी विजय, दोन जागी धक्‍का

Published On: Jun 03 2019 1:44AM | Last Updated: Jun 02 2019 7:35PM
भूपेंद्र गणवीर

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना विदर्भात भाजप-सेना युतीने दहाही जागा जिंकल्या. 2019 मध्ये देशभर मोदी लाट होती. या लाटेत काँग्रेस धराशायी झाली. एनडीएने तीनशेचा आकडा पार केला. मात्र विदर्भात मोदी सरकारचे मंत्री हंसराज अहिर आणि शिवसेनेचे गट नेते आनंदराव अडसूळ पराभूत झाले. अहिर  भाजपमधील गटबाजीचे शिकार झाले. अहिर मोदी यांचे खासमखास आहेत. विदर्भातील घडामोडींवर नजर राखण्याचेही वेगळे काम होते. त्यासाठी त्यांना महत्त्वाचे गृह राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. हा पराभव सरळ दिल्लीला धक्‍का समजला जात आहे. त्या मतदारसंघात 31 हजार 500 मतांची आघाडी काँग्रेस उमेदवाराला मिळाली. त्यामुळेच बाळू धानोरकर अवघ्या 44 हजार 700 मतांच्या आघाडीने विजयी झाले. विदर्भात सर्वाधिक चर्चा या पराभवाची आहे.

या भागात काँग्रेसकडे दमदार नेतृत्व नाही. या उलट भाजपकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहराज्य मंत्री हंसराज अहिर होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन कॅबिनेट व तीन राज्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदींच्या अनेक सभा घेण्यात आल्या. फडणवीस-गडकरींनीसुद्धा सभांचा सपाटा लावला होता. त्याचा फायदा झालेला आहे. नोटबंदी, जीएसटीचा रोष कायम होता. शेतकरीही नाखूश होते. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शेतकरी सन्मान निधीची घोषणा केली. शेतकर्‍यांच्या खात्यात पहिले दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये सरळ जमा करण्यास आरंभ केला. त्याचा लाभ भाजप-सेना उमेदवारांना मिळाला. वंचित बहुजन आघाडी उमेदवारांनीही काही मतदारसंघांत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या पराभवात हातभार लागला.

नागपूर : बिग फाईट गडकरी जिंकले

या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले असा सामना झाला. पटोले भाजपची खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे या लढतीकडे बिग फाईट म्हणून बघितले जात होते. येथे आरएसएसचे मुख्यालय आहे. यामुळे या लढतीकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले होते. गडकरी 2014 ला प्रथमच लोकसभेची निवडणूक लढले. 2 लाख 85 हजारांवर मतांची भक्‍कम आघाडी घेत विजयी झाले. नाना पटोले यांना डीएमके (दलित-मुस्लिम-कुणबी) कार्ड चालले. त्याचा फटका  बसल्याने गडकरींची आघाडी घटली. गडकरी-फडणवीस जोडीने शहरात भरपूर विकासकामे केली. मेट्रो रेल्वे, आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटी, जीईसी आदी शिक्षण संस्था आणि रस्त्यांची कामे प्रमुख आहेत. नाना पटोले हे नागपूरसाठी नवखे होते. 2014 ला ते भंडार्‍यातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तिथे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. ही बिंगकिलर इमेज नागपुरात टिकली नाही. या मतदारसंघात 30 उमेदवार रिंगणात होते. 54.74 टक्के मतदान झाले होते. गडकरी  काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात दोन लाखावर मतांच्या आघाडीने विजयी झाले. गडकरी यांना 6 लाख 60 हजार 221 मते मिळाली. नागपूरकरांनी विकासाच्या वाजूने कौल दिला. 

रामटेक : सेना उमेदवार विजयी

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे यांच्या विरोधात काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना मैदानात उतरविले. सेनेकडून मेणबत्ती हवी की अगरबत्ती, असा प्रचार करण्यात आला. या मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात होते. 62.12 टक्के मतदान झाले होते. तुमाणे यांच्यासाठी गडकरी-फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लावले. त्याचा लाभ झाला. तुमाणे 1 लाख 20 हजारावर मतांच्या आघाडीने विजयी झाले. ते दुसर्‍यांदा खासदार झाले.

चंद्रपूर : अहिर पराभूत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा हा जिल्हा आहेे. तेथून एकमेव काँग्रेस उमेदवार निवडून आला. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर अशी लढत झाली. धानोरकर हे शिवसेनेचे आमदार होते. आमदारकी सोडून ते काँग्रेसमध्ये आले आणि थेट रिंगणात उडी घेतली. त्यामुळे एकतर्फी वाटणार्‍या या लढतीत रंगत आली. येथे जातीचे कार्ड खूप चालले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दारूबंदीचा विषयही प्रचारात राहिला. निवडणुकीच्या धामधुमीत धानोरकर यांच्या घरावर आयकर छापा टाकण्यात आला होता. त्याचा फटकाही धानोरकरांना बसला. तरीही 44 हजार 740 मतांनी ते विजयी झाले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बल्हारशहा हा त्यांचा मतदारसंघ. या मतदारसंघात अहिर 30 हजार 500 मतांनी पिछाडीवर राहिले. मुनगंटीवार कार्यक्षम मंत्री आहेत. विकासकामेही भरपूर केली. तरी पिछाडी कशी हा चर्चेचा विषय आहे. दारूबंदी भोवली की जातीय जोडतोड? या पराभवाचे चटके विधानसभा निवडणुकीत बसणार तर नाही ना, अशी चर्चा आहे.

अमरावती : नवनीत राणा विजयी

अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांचा आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी पराभव केला. सुरुवातीपासून काट्याची लढाई होती. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या  या मतदारसंघात असली-नकली जातीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर राणा यांनी मात केली. नवनीत राणा यांचे पती रवी राणा अपक्ष आमदार आहेत. नवनीत राणा यांच्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केले. 36 हजार 951 मतांनी त्या विजयी झाल्या. अडसूळ पाचवेळा निवडून आले होते.

गडचिरोली : भाजप विजयी

गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून दारूबंदी आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांना काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांनी झुंज दिली. साधनसंपत्तीचा अभाव उसेंडींकडे होता. नक्षल प्रभावित हा जिल्हा आहे. आदिवासीबहुल असलेला हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. येथे 61.32 टक्के मतदान झाले. केवळ 5 उमेदवार रिंगणात होते. सरळ लढतीत भाजपचे अशोक नेते 77 हजार 526 मतांनी विजयी झाले. उसेंडी यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश गजवे यांना 1 लाख 9 हजार मते मिळाली. आदिवासींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात माना समाजाचे रमेश गजबे लढले कसे, हा वेगळा विषय आहे. सरपंच व सदस्य निवडून आल्यानंतर त्यांना अपात्र करण्यात आल्याचीही काही प्रकरणे आहेत.

भंडारा : मेंढे विजयी

भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ऐनवेळी स्वत: माघार घेत माजी राज्यमंत्री नाना पंचबुधे यांना रिंगणात उतरविले. भाजपने त्यांच्या विरोधात सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. ते भंडार्‍याचे नगराध्यक्ष आहेत. मतदारसंघातील अपरिचित असले तरी संघाचे निष्ठावान कार्यकर्ते ही त्यांची जमेची बाजू होती. ते झाडे कुणबी आहेत. त्याचाही त्यांना लाभ मिळाल्याने दणदणीत विजय झाला.  येथे 14 उमेदवार होते. 68.27 टक्के मतदान झाले होते. मेंढे 1 लाख 96 हजार 520 मतांच्या आघाडीने विजयी झाले. हा उल्लेखनीय विजय आहे.

वर्धा : तडस विजयी

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस यांनी मैदान मारले. तडस यांच्या विरोधात काँग्रेसने चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली. त्या दिल्लीत राहतात. काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांची मुलगी एवढीच त्यांची जमेची बाजू. मतदारसंघात संपर्क नसताना त्यांना का उमेदवारी देण्यात आली, असा प्रश्‍न विचारला जात होता. जातीच्या प्रचारामुळे त्या लढतीत राहिल्या. 14 उमेदवार रिंगणात होते. सरळ लढतीत तडस 1 लाख 78 हजार 669 मतांनी विजयी झाले.

यवतमाळ : भावना गवळी विजयी

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे पराभूत झाले. शिवसेनेच्या भावना गवळी चौथ्यांदा विजयी झाल्या. प्रारंभी नाराजीचा सूर होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ‘मोदी को लाना है, भावना गवळी मजबुरी है’ असा नारा दिला. तेव्हापासून कार्यकर्ते कामास लागले. त्याचा फायदा झाला. या भागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. गवळी 1 लाख 16 हजार 907 मतांनी विजयी झाल्या. पाचव्यांदा खासदार होणार्‍या सेनेच्या त्या एकमेव महिला खासदार आहेत. गटबाजी आड आली नाही तर त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागू शकते.

बुलडाणा : जाधव यांची हॅट्ट्रिक

या मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला. या विजयामुळे ते तिसर्‍यांदा खासदार झाले. येथे 12 उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत जाधव-शिंगणे यांच्यात झाली. 1 लाख 37 हजार मताधिक्याने विजयी झाले.  

अकोला : संजय धोत्रे विजयी

या मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल व वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसने पटेल यांची उमेदवारी जाहीर केली. तेव्हाच धोत्रे यांचा विजय निश्‍चित झाला होता. अपेक्षप्रमाणे निकाल लागला. 2 लाख 75 हजार 596 मतांच्या आघाडीने धोत्रे विजयी झाले. सलग चौथ्यांदा ते निवडून आले. ते वकील आहेत. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.