Wed, Jun 26, 2019 18:31होमपेज › Vidarbha › विरोधक निष्प्रभच

विरोधक निष्प्रभच

Published On: Dec 18 2017 2:45AM | Last Updated: Dec 18 2017 1:30AM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात सरकारवर हल्लाबोल यात्रा काढणार्‍या आणि सरकारशी असहकार पुकारण्याचे आवाहन सभागृहाबाहेर करणार्‍या विरोधकांनी विशेषतः राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात मात्र पार नांगीच टाकली होती. अनेक विषयांवर सरकारची कोंडी करण्याची संधी असतानाही विरोधकांनी ती घेतली नाही. मात्र, सिंचन घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचा आवेश पार गळून पडला, आता सोमवार (दि.18) पासून सुरू होणार्‍या आठवड्यात तरी विरोधकांचा आवेश दिसतो की नाही याबद्दल उत्सुकता आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री विरोधकांसाठी चहापान ठेवतात. गेल्या तीन वर्षांतील पहिल्या वर्षीचा अपवाद सोडला, तर विरोधकांनी या चहापानावर बहिष्कारच टाकला आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होणार, सरकारला विरोधक चांगलेच धारेवर धरणार, असे वाटत होते. त्यातच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांनीही संयुक्तपणे विधान भवनावर हल्लाबोल मोर्चा काढल्याने संघर्षाची किनारही निर्माण झाली होती.  मात्र, अधिवेशन सुरू झाले, तेव्हा पहिला दिवस सोडला, तर विरोधक पार थंडच पडले. 
सिंचन घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावर तर राष्ट्रवादीचा रंगच उडाला, असे म्हणावे लागेल. वास्तविक कर्जमाफीतील घोळ, शेतकर्‍यांचे अनेक प्रश्‍न घेऊन सरकारवर सभागृहातही हल्लाबोल करता आला असता, पण तसे झाले नाही. 

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची अंमलबजावणी करताना काही चुका झाल्याची कबुली देताच विरोधक थंडच झाले. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गावात, नागपूरपासून राज्यभरात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि शेतकर्‍यांपासून कामगारांपर्यंतचे अनेक प्रश्‍न घेऊन सरकारला जाब विचारण्याची संधीदेखील काँग्रेस-राष्ट्रवादीने घालवली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याची जाहीर धमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर अशी धमकी देणार्‍यांचे सरकारच उलथवण्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता. त्यामुळे आता अधिवेशनात सरकार आणि विरोधकांचा संघर्ष पाहायला मिळेल, असा होरा होता; पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अधिक आक्रमक झालेले दिसले. हल्लाबोल यात्रेची तर त्यांनी खिल्लीच उडवली, आणि ही तर काँग्रेस-राष्ट्रवादीची डल्लाबोल यात्रा असल्याची कडवट टीकाही केली.

शेतकर्‍यांचे प्रश्‍न दूरच, उलट शिवजयंती तिथीवरून साजरी करायची की तारखेवरून याबद्दलचा जुनाच वाद पुन्हा उकरून काढला गेला. आणि अशाच निरर्थक वादांनी गेला आठवडा गाजला. शिवसेनेने तर सपशेल पलटी मारून सभागृहात भाजपपुढे लोटांगणच घातले आहे. बाहेर भाजप आणि सरकारच्या विरोधात बोलायचे आणि सभागृहात मात्र मूग गिळून गप्प बसायचे हा वसा याही वेळी शिवसेनेने जपला.