Wed, Nov 14, 2018 14:24होमपेज › Vidarbha › माघार कुणाची? जानकर की देशमुख

माघार कुणाची? जानकर की देशमुख

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 09 2018 1:08AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक होणार असली तरी ही निवडणूक बिनविरोध होणार का? ते सोमवारी स्पष्ट होणार आहे. भाजपने एक अतिरिक्त उमेदवार दिला आहे. त्यापैकी दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर की भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख माघार घेणार, हे स्पष्ट होणार आहे.

ही विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजप वगळता सर्वच पक्षांनी विधानसभेतील आपापल्या संख्याबळानुसार उमेदवार दिले आहेत. 11 जागांमध्ये सत्ताधारी भाजपच्या सर्वाधिक पाच, शिवसेना दोन, काँग्रेस दोन, राष्ट्रवादी एक, तर शेकाप एक मिळून 11 उमेदवार निवडून जाऊ शकतात. मात्र, भाजपने सहा उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. जानकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर झाली तरी त्यांनी नकार देत स्वतः च्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा हट्ट धरला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करूनही त्यांनी हट्ट कायम ठेवल्याने अखेर जानकर यांना रासपच्या तिकिटावर अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, दगाफटका नको म्हणून पृथ्वीराज देशमुख यांचा अतिरिक्त अर्ज दाखल करण्यात आला. भाजप देशमुख यांचा अर्ज मागे घेण्याची शक्यता अधिक आहे.

जानकर यांनी माघार घेतली तरी सहा महिने त्यांच्या मंत्रिपदाला धोका नाही. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरूनही ते विधान परिषदेवर जाऊ शकतात. त्यामुळे यावेळी देशमुख यांना विधान परिषदेवर पाठवून जानकर यांना पुढच्यावेळी संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा भाजपामध्ये आहे. मात्र, ती शक्यता कमी आहे.