Mon, Nov 19, 2018 17:13होमपेज › Vidarbha › नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात भुजबळांचे स्वागत

नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात भुजबळांचे स्वागत

Published On: Jul 09 2018 1:17AM | Last Updated: Jul 09 2018 1:17AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता  नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानातळाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल आणि महात्मा जोतिबा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यंनी ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. विमानतळाबाहेर असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर भुजबळांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढली. सोमवारी भुजबळ विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराजधानीत आले.

भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तब्बल दोन वर्षे तुरुंगात होते. सुटकेनंतर ते प्रथमच विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावणार असून विरोधी बाकांवरील मंडळींना त्यांच्यामुळे  बळ मिळणार आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुणे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ यांनी तडाखेबंद भाषण केले होते. पवारांनी त्यांना  घातलेल्या पगडीनंतर  पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी हा वाद निर्माण झाला होता. राजकीय विरोधकांनी भुजबळांना टार्गेट केले होते. ते विधानसभेत काय बोलतील, याकडे लक्ष लागले आहे.