Sun, Apr 21, 2019 00:00होमपेज › Vidarbha › भगवद‍्गीता वाटपाशी सरकारचा संबंध नाही

भगवद‍्गीता वाटपाशी सरकारचा संबंध नाही

Published On: Jul 12 2018 2:44PM | Last Updated: Jul 12 2018 11:35PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

महाविद्यालयांना वाटप करण्यात आलेल्या भगवद‍्गीतेच्या संचाशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. भगवद‍्गीतेच्या संचाचे वाटप हे सरकारकडून करण्यात आलेले नाही, असा खुलासा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे केला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भगवद‍्गीतेचे वाटप केल्याबद्दल विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका सुरू झाली आहे. सरकार गीतेचे वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये तेढ निर्माण करत आहे. सरकारचा हा प्रयत्न शिक्षणाचे भगवीकरण आहे, असा आरोपही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यावर खुलासा करताना विनोद तावडे म्हणाले, भक्‍तीवेदांत ट्रस्टने भगवद‍्गीतेचे संच राज्य सरकारने महाविद्यालयांमध्ये मोफत वाटप करावेत, असा प्रस्ताव दिला होता. परंतु, भगवद‍्गीतेचे मोफत संच हे सरकार नव्हे, तर ट्रस्टमार्फतच महाविद्यालयांना वाटप करावेत, असे सरकारने स्पष्ट केले होते. तसेच भगवद‍्गीतेचे संच महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याबाबत कोणतेही परिपत्रक सरकारने काढलेले नाही. केवळ महाविद्यालयांची यादी भक्‍तीवेदांत ट्रस्टला उपलब्ध करून देण्यात आली. या ट्रस्टने महाविद्यालयांना संचाचे मोफत वाटप केले असले, तरी सरकारने ट्रस्टला कोणतेही पैसे दिलेले नाहीत, असेही तावडे म्हणाले.

विरोधक आणि समाजवादी विचारसरणीचे आमदार हे चुकीचा प्रचार करत आहेत, असे सांगतानाच भगवद‍्गीता वाईट आहे आणि त्याचे वाटप करू नये, असे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान तावडे यांनी दिले. जर कोणी कुराण, बायबलचे वाटप करण्याची विनंती केली, तर त्यासाठीही परवानगी देण्यात येईल, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.