Tue, Oct 24, 2017 16:59होमपेज › Vidarbha › ‘एनडीए’त रहायचे की नाही १५ दिवसांत निर्णय : शेट्टी

‘एनडीए’त रहायचे की नाही १५ दिवसांत निर्णय : शेट्टी

Published On: Aug 13 2017 1:06PM | Last Updated: Aug 13 2017 1:43PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत असंवेदनशील असल्यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर नाराज असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी ‘एनडीए’मध्ये राहायचे की नाही, याबाबत 15 दिवसांत आपण निर्णय घेणार असल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत नागपूर येथे दिली. याचबरोबर आपण केंद्रातही मंत्रिपद स्वीकारणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. जोपर्यंत शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आपण कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

आज एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते नागपूरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, याकरिता आपण देशात फिरून शेतकर्‍यांना एकत्र करीत आहोत. 20 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे शेतकर्‍यांचा मेळावा घेण्यात येणार असून यावेळी सरकार जोपर्यंत शेतकर्‍यंना कर्जमाफी जाहीर करीत नाही, तोपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी संघटनेने निष्कासित केले आहे. आता ते कोणाचे सदस्य आहेत, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.