Tue, May 21, 2019 23:03होमपेज › Vidarbha › ..तर लाखो लोकांसह धर्मांतर करणार : मायावती

..तर लाखो लोकांसह धर्मांतर करणार : मायावती

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 11 2017 1:35AM

बुकमार्क करा

नागपूर : वृत्तसंस्था

भाजप सरकार हे दलितांच्या द्वेषाचे राजकारण करत आहे. त्यामुळेच मी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपचे नेते सुधारले नाहीत, तर मी लाखो लोकांसह धर्मांतर करेन, अशी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी नागपुरात केली. 

मायावती म्हणाल्या, राजीनामा दिल्यानंतर मी दलितांसोबतच आदिवासी, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांच्या प्रगतीसाठी देशव्यापी दौरे करून काम सुरू केले आहे. ‘एनडीए’ दलितांच्या विकासासाठी काहीच करत नाही. त्यांचा अजेंडा फक्‍त उद्योगपतींच्या हिताचा आहे.

मायावती यांनी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांवर कडाडून टीका केली. हे दोन्ही पक्ष दलितविरोधी असल्याचे मायावती म्हणाल्या. या पक्षांतील राष्ट्रपती, मुख्यमंत्री जरी दलित समाजातील असले तरी त्यांचे पक्ष दलितविरोधी असल्यामुळे त्यांच्याकडून दलितांचा काहीही विकास झाला नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

सध्या भाजपला दलितांचा फार पुळका आलेला आहे. मात्र, संपूर्ण देशात ओबीसींवर चुकीच्या धोरणामुळे अन्याय होत आहे. राम मंदिराचा मुद्दा तापवला जात आहे. दलितांचा यामुळे काहीही फायदा होणार नाही, असे मायावती म्हणाल्या. 

काँग्रेसने मंडल कमिशनच्या शिफारशी लागू केल्या नाहीत, तेव्हा याविरोधात आम्ही मोठा लढा दिला. दलितांचा उद्धार आणि बाबासाहेबांना भारतरत्न देण्याच्या अटीवरच आम्ही व्ही. पी. सिंगांना बाहेरून पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपला हे आवडले नाही. त्यामुळेच त्यांनी व्ही. पी. सिंग सरकारचे समर्थन काढले, असा आरोप मायावती यांनी भाजपवर केला. खासगी उद्योगातील आरक्षणासाठी आम्ही लढा देण्याच्या तयारीत आहोत, असेही मायावती यावेळी म्हणाल्या.