Sun, May 26, 2019 19:44होमपेज › Vidarbha › मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Published On: Dec 07 2017 1:45AM | Last Updated: Dec 06 2017 11:53PM

बुकमार्क करा

मानवत : प्रतिनिधी

तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुखाने खाजगी शाळेत शिकणार्‍या मुलीचा विनयभंग केला. ही घटना 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास मानवत रोड- सेलू रस्त्यावर ईरळद पाटीच्या पुढे कारमध्ये घडली. या प्रकरणात सीईओ संजय ससाणे यांनी निलंबनाची कारवाई केली असून आरोपीविरूध्द मानवत ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरारी असून पोलिस पथके शोधासाठी पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, मुख्याध्यापकाच्या कृत्याचा निषेध म्हणून सावरगाव केंद्रांतर्गत येणार्‍या 13 शाळा पालकांनी 6 डिसेंबरला बंद ठेवल्या होत्या.

सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शेख नूर मोहम्मद नाजीरोद्दीन नावाचा मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख कार्यरत आहे. गावात खाजगी संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयही आहे. जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने 1 डिसेंबर रोजी या खाजगी शाळेतील अल्पवयीन मुलीस व इतर दोन मुलांना बोलावून सांगितले की, 2 डिसेंबर रोजी ईरळद येथील शाळेत एनएमएमएस परीक्षेचा सराव आहे. तुम्ही उद्या सकाळी 8 वाजता तयार रहा. 2 डिसेंबरला सकाळी 11 वाजता शेख नूर सावरगाव येथे गेला व आपल्या कारमध्ये पीडित मुलगी व गावातील मोहन घाटूळ व योगेश घाटूळ यांना सोबत घेऊन दुपारी बारा वाजता इरळद येथे पोहोचला. तेथे परीक्षा वगैरे काहीच नव्हती. मुलांनी सोबत आणलेले डब्बे तेथे खाल्ले व ते दुपारी 2 वाजता परत सेलू टी पॉईंटवर आले. तेथे शेख नूर याने गाडीतील सोबतच्या दोन मुलांना वीस रुपये देऊन खाली उतरवून देत पाण्याची बाटली आणण्यास सांगितले.

दोन्ही मुले गाडीखाली उतरताच शेख नूरने आपली गाडी वळवली आणि सेलूच्या दिशेने इरळद फाट्यापुढे नेऊन उभी केली. यावेळी शेख नूरने पीडित मुलीचा हात धरला व लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला लॉक होते. मुलगी आपले ऐकत नाही हे लक्षात आल्यावर शेख नूरने गाडी वळवली आणि सेलू टी पॉईंटकडे निघाला. मात्र जाताना घडलेली बाब कोणास सांगितल्यास चाकूने मारण्याची धमकी दिली. सायंकाळी 4.30 वाजता शेख नूर याने मुलांना सावरगाव येथे नेऊन सोडले. घरी आल्यावर पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती. आईने तिला विेशासात घेतले व धीर दिला. तेव्हा मुलीने घडलेली हकीकत आईस सांगितली. नातेवाईकांना कळाल्यानंतर त्यांनी गावातील 100 ते 150 नागरिकांना सोबत घेऊन 5 डिसेंबर रोजी रात्री मानवत पोलिस ठाणे गाठले.

घटनेचे वृत्त समजल्यानंतर रात्री जि.प.सदस्य पंकज आंबेगावकर, संतोष आंबेगावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धेशर लाडाने, यांनी पोलीस ठाण्यात तसेच दुसर्‍या दिवशी जि.प. उपाध्यक्ष भावना नखाते, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे, विस्तार अधिकारी डी. आर. रणामाळे, जि. प. सदस्य पंकज आंबेगावकर, न.प.सदस्य दीपक बारहाते यांनी गावातील शाळेस भेट दिली. गावचे सरपंच गजानन घाटूळ, उपसरपंच संदीप जाधव, बालासाहेब जाधव, नारायण घाटूळ, नारायणराव गव्हाणे, बबन घाटूळ, अविनाश घाटूळ, योगेश काळे उपस्थित होते.

वकील संघ केस मोफत लढणार
या बाबत वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील जाधव यांनी पीडित मुलीची केस मोफत लढून तिला न्याय देणार असल्याचे सांगितले. शिवाय वकील संघ यासाठी आपल्याबरोबर असल्याचे ते बोलले.