Sat, Jan 19, 2019 03:28होमपेज › Vidarbha › मिळते ती मदत घ्या; रावते शेतकर्‍यांवर संतापले

मिळते ती मदत घ्या; रावते शेतकर्‍यांवर संतापले

Published On: Feb 18 2018 7:57AM | Last Updated: Feb 18 2018 7:57AMनागपूर : प्रतिनिधी 

फटकळ बोलणे व  शीघ्रकोपी स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शुक्रवारी वाशीम जिल्ह्यात दौर्‍यादरम्यान गारपीटग्रस्त शेतकर्‍यांवरच संतापले. जी मिळते ती मदत घ्या, कुरकुर करू नका असे त्यांनी त्यांना भेटायला आलेल्या शेतकर्‍यांना सुनावल्याने सोबतचे अधिकारी आणि शिवसेना कार्यकर्तेही चकरावून गेले. 

राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर अनेक वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणार्‍या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे  शुक्रवारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथे दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी मदत अद्याप मिळाली नाही अशी तक्रार करणार्‍या शेतकर्‍याला ‘आता काय तुमच्या दरवाजात नोटा घेऊन उभा राहू?’ असा भावना दुखावणारा प्रश्न विचारला. त्यांच्या या उद‍्गाराने जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच संतप्त झाले.

 वाशीम जिल्ह्यामध्ये सलग तीन दिवस तुफान गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे दुखावलेले शेतकरी रावतेंच्या या गारपीटीने अधिकच दुखावल्याने सर्वत्र नाराजी व्यक्‍त होत आहे.