Sat, May 25, 2019 23:20होमपेज › Vidarbha › भयंकर न्याय; बलात्कार्‍याला शिक्षा मटणाच्या गावजेवणाची!

भयंकर न्याय; बलात्कार्‍याला शिक्षा मटणाच्या गावजेवणाची!

Published On: Feb 05 2018 2:04AM | Last Updated: Feb 05 2018 2:04AMनागपूर : प्रतिनिधी

पाचवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी गडचिरोली  जिल्ह्यातील मोहली येथील जातपंचायतीने आरोपीला अजब शिक्षा दिल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कारप्रकरणी जातपंचायतीने आरोपीला 12 हजार रुपये दंड व बकर्‍याचे गावजेवण देण्याची शिक्षा दिली. त्यामुळे अशा जातपंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमकाल संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली.

आरोपी अनिल मडावी 17 जानेवारीला पीडित मुलीला तिच्या आईची प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगून धानोरा तालुक्यातील मोहली जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतून घेऊन गेला. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीला गाव तलावाकडे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यात पीडित विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. 18 जानेवारीला मोहली येथे जातपंचायत बोलावण्यात आली. यात सरपंच गावडे, उपसरपंच बागू पदा, माजी तंमुस अध्यक्ष रोहिदास पदा, माडिया गोंड समाजातील अन्य नागरिक उपस्थित होते. जातपंचायतीच्या निर्णयानुसार आरोपी अनिल मडावी याला 12 हजार रुपये दंड व गावाला बकर्‍याचे जेवण देण्याची शिक्षा सुनावण्यात आली. 

त्यानुसार आरोपी अनिल मडावी याने गावजेवण दिले. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांना दंडाची रक्‍कम दिली नाही. पीडित विद्यार्थिनीची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी जातपंचायतीचा सल्ला घेतला. मात्र, जातपंचायतीकडून कुठलीही मदत न मिळाल्याने पोलीस पाटील नंदा नलचुलवार यांच्याशी संपर्क साधून धानोरा पोलीस ठाण्यात 24 जानेवारी रोजी आरोपी अनिल मडावीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. मात्र, याप्रकरणी जातपंचायतीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.