Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Vidarbha › पट्टेदार वाघाचे १४ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

पट्टेदार वाघाचे १४ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 1:16AMनागपूर : प्रतिनिधी

अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी माणूस वेगवेगळी आंदोलने करून न्याय मिळवतो. पण एखादा वन्यजीव असे करत असेल तर? जंगलाचा राजा असलेल्या नरभक्षी पट्टेदार वाघाला पकडल्यानंतर त्याने वनविभागाच्या विभागातच अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यामुळे वनविभागाची चिंता वाढली आहे. हे आंदोलन या नरभक्षी वाघाने चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही परिक्षेत्रात  गेल्या 14 दिवसांपासून सुरू ठेवले असल्यामुळे वनविभागाच्या डोक्याला ताप झाला आहे. तो आंदोलन केव्हा सोडतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. या नरभक्षी वाघाला नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले असून येथेही त्याचा उपवास सुरूच आहे.

ब्रह्मपुरी वनविभागातील सिंदेवाही परिक्षेत्रात 1 जुलै रोजी सी-वन नावाचा एक तरुण वाघ पकडण्यात आला. त्याचे वय सुमारे अडीच वर्षांचे आहे. या वाघाने सिंदेवाही तालुक्यात पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या नरभक्षी वाघाला पकडण्याचे आदेश वनविभागाने दिले. त्यानुसार 1 जुलै रोजी त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले. 2 जुलैला उपचारासाठी त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात आणले. अतिशय आक्रमक आणि चिडखोर असलेल्या या वाघाला दहा दिवस येथे ठेवण्यात आले. मात्र, या दहा दिवसांत त्याने काही सुद्धा खाल्लेले नाही.

जंगलात मुक्तपणे संचार करणारा आणि भूक लागेल तेव्हा शिकार करणारा वाघ हा स्वभावाने स्वाभिमानी असतो. पिंजर्‍यात अडकल्यावर त्याच्या स्वाभिमानाला कुठेतरी ठेच बसली असावी. म्हणून त्याने उपोषण केले असावे असा तर्क अभ्यासक लावत आहेत. पण असा उपवास किती दिवस चालणार, हा मोठा प्रश्न आहे. पिंजर्‍यात ठेवले तर उपवास करतो आणि जंगलात सोडले तर माणसांना मारतो, त्यामुळे या वाघाचे संगोपन करायचे कसे, असा मोठा प्रश्न वनविभागापुढे आहे.

एक बकरी पिंज़र्‍यात सोडण्यात आली. तिला त्याने मारले, मात्र खाल्ले नाही. त्यानंतर एक कोंबडीही सोडण्यात आली, तिलाही वाघाने हात लावला नाही. मांस टाकण्यात आले, पण तेही खाल्ले नाही. जणू काही तो आपल्यावर झालेल्या अन्यायाचा विरोधच करत होता. मला मुक्त करा, अशी मूक मागणीच तो करतोय की काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याच्या अन्नत्यागामुळे वनविभागातील अधिकार्‍यांनाही काही सुचेना. काय करावे, यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानुसार त्याला 11 जुलै रोजी नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात पाठवण्यात आले. मात्र, तिथे पाठवले तरीही वाघोबांनी उपवास काही सोडलेला नाही. गोरेवाडामध्येही त्याने अन्नाला शिवले नाही.