Mon, Aug 19, 2019 18:06होमपेज › Vidarbha › चंद्रपुरात महापाषाणयुगीन एकाश्म स्मारके

चंद्रपुरात महापाषाणयुगीन एकाश्म स्मारके

Published On: Jan 23 2018 8:55PM | Last Updated: Jan 21 2018 8:49PMनागपूर : प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणार्‍या डोंगरगाव (बु.) परिसरात महापाषाणयुगीन संस्कृतीतील एकाश्म स्मारके एका इतिहास अभ्यासकाने शोधून काढली आहेत. या परिसरात 33 एकाश्म स्मारकशिळा आढळून आल्या असून, त्यापैकी 32 एका ठिकाणी, तर चिचोली खुर्द गावानजीक टेकडीच्या पायथ्याशी शेंदूरलेपित स्वरूपात आढळून आली आहे. डोंगरगावातील ही स्मारके महाराष्ट्रातील बहुधा सर्वाधिक एकाश्म स्मारके असणारे स्थळ झाले असल्याचा दावा मुंबईतील इतिहास अभ्यासक अमित भगत यांनी केला आहे.

नागभीड शहरात एकाश्म स्मारकशिळा 1997 साली पुरातत्त्व संशोधक डॉ. र. रा. बोरकर यांनी शोधल्या होत्या. त्यानंतर त्याच परिसरात या मोठ्या संख्येतील एकाश्म स्मारकांचा शोध लावला असल्यामुळे इतिहास संशोधकांची पावले भविष्यात नागभीडच्या दिशेने वळणार आहेत. नागभीड शहराच्या वायव्येस चार-पाच किमीच्या अंतरावर डोंगरगाव (बु.) गाव होते. परंतु, सद्यस्थितीत ते गाव विस्थापित होऊन तीन किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव खुर्द येथे वसले असल्याने हा भाग ओसाड पडून जंगलाने वेढला गेला. या परिसरात एकूण 33 एकाश्म स्मारके आढळून आली. ही स्मारके भिन्‍न प्रकारची असून, त्यांची उंची 0.5 मीटर ते 3.25 मीटरपर्यंत आहे. रुंदी 55 सेंमी ते 160 सेंमीपर्यंत आहे. यात दोन मनुष्याकृती असणारे शिलास्तंभ आहे. किमान सहा शिलास्तंभ हे जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळून येतात. त्यातील तीन दगडी स्लॅबच्या स्वरूपातील दफन असून, सात स्मारके निम्म्याहून अधिक प्रमाणात जमिनीत गाडली गेली आहेत. 20 शिलास्तंभ सरळ व तिरप्या दिशेत उभ्या आहेत. यातील बहुतेक शिलास्तंभ पायालगत रुंद असून, त्यानंतर वरच्या दिशेने निमुळते होत गेले आहे. हे सर्वच शिलास्तंभ वालुका पाषाणातील आहेत.

या शिलास्तंभाच्या सभोवताल दगडगोटे विखुरलेल्या व रचलेल्या स्वरूपात आढळून येतात. त्यातील काही अश्मयुगीन हत्याराशी साधर्म्य दर्शवितात. या स्थळानजीकच एक दगडगोट्यांनी व्याप्त झीज झालेली लहानशी टेकडी असून, काही अंतरावर एक तलाव आहे. त्याच्या काठावर पांढर्‍या मातीची उंच सखल जमीन आहे. या जागेचे उत्खनन झाल्यास कदाचित बृहदाश्मयुगीन मानव वसाहतीचे अवशेष सापडू शकतात, असा अंदाजही अमित भगत यांनी वर्तविला आहे.