Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Vidarbha › सिडकोतील जमीन खरेदीला स्थगिती : देवेंद्र फडणवीस

सिडकोतील जमीन खरेदीला स्थगिती : देवेंद्र फडणवीस

Published On: Jul 07 2018 1:38AM | Last Updated: Jul 07 2018 1:38AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांना रायगड जिल्ह्यात  दिलेल्या भूखंड खरेदीच्या व्यवहाराला न्यायालयीन चौकशी होईपर्यंत स्थगिती देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

रायगडमधील ओवे या  गावात आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारने जमीन दिली होती. ही जमीन खासगी बिल्डरने खरेदी केल्यावरून गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी हंगामा केला होता. विरोधकांनी सरकारवरच संशय घेतल्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, या घोषणेने विरोधकांचे समाधान झाले नाही. 

सध्या विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ जादा आहे.  या सभागृहात विरोधक अधिक आक्रमक होण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री फडणवीस यांनी  या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती दिल्याची घोषणा केली. 

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना कळविले असून, पुढील विक्री होऊ शकणार नाही, याची  खबरदारी घेण्याचे आदेश आपण दिले आहेत. तसेच  त्यामध्ये कोणताही थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट होऊ नये, यासंदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन चौकशी पूर्ण होत नाही आणि त्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत जमिनीची विक्री, हस्तांतरण  किंवा जमीन लीजला प्रतिबंध घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

त्यावर सिडको व्यवहाराला स्थगिती हा आमचा नैतिक विजय आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी व्यक्‍त केली. ते म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारमधील मागच्या प्रकरणांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानसभेत वेळ मारून नेली. मात्र, हे प्रकरण अंगलट येईल,  याची जाणीव झाल्याने मुख्यमंत्र्यांनी या व्यवहाराला स्थगिती दिली.