Fri, Jul 19, 2019 19:58होमपेज › Vidarbha › विधानभवनाला दहशतवाद्यांपासून धोका?

विधानभवनाला दहशतवाद्यांपासून धोका?

Published On: Jul 09 2018 8:55PM | Last Updated: Jul 10 2018 1:04AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानभवन प्रवेश अधिक कडक करण्याचे निर्देश दिल्यामुळे आमदार आणि मंत्र्यांच्या भुवया उंचावल्या असून, सभापतींच्या या आदेशामुळे विधानभवनाला दहशतवाद्यांचा धोका आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मागील आठवड्यापासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या आठवड्यामध्ये विधानभवनच्या आवारात अनेक अभ्यागतांची ये-जा सुरू होती. मात्र, सोमवारी अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती निंबाळकरांनी विधानभवन वास्तूमधील प्रवेश कडक केला आहे. आमदारांसोबत त्यांच्या केवळ एका खासगी सचिवाला प्रवेश पत्र असेल तरच प्रवेश देण्याच्या सूचना केल्या. वैयक्‍तिक शासकीय कामांसाठी येणार्‍या व्यक्‍ती व मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाला विधानभवन प्रवेश बंदी केली आहे. संबंधितांनी मंत्र्यांंच्या निवासस्थानी भेट घेऊन आपले निवेदन द्यावे, तसेच मंत्र्यांनी यापुढे आपल्या खात्याच्या बैठका विधानभवनातील दालनात न घेता आपल्या निवासस्थानी घेण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

अधिवेशन कालावधीमध्ये विधानभवनात येणार्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी महिला बचत गटांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी जागा वितरित करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी या बचत गटांनी स्टॉल उभारले आहेत. त्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत आहेत. अशा कर्मचार्‍यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नये. बाहेरून आणण्यात येणार्‍या त्यांच्याकडील वस्तूंची कडक तपासणी करूनच प्रवेश द्यावा, असेही त्यांनी आदेश दिले.